सावर्डेत दीपक पाऊसकर यांचा दणदणीत विजय
By admin | Published: March 12, 2017 02:25 AM2017-03-12T02:25:29+5:302017-03-12T02:26:48+5:30
फोंडा : सावर्डे मतदारसंघातून मगोपचे उमेदवार दीपक पाऊसकर यांनी दणदणीत विजयाची नोंद करताना भाजपचे उमेदवार गणेश गावकर
फोंडा : सावर्डे मतदारसंघातून मगोपचे उमेदवार दीपक पाऊसकर यांनी दणदणीत विजयाची नोंद करताना भाजपचे उमेदवार गणेश गावकर यांचा ५२२१ मताधिक्याने पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच दक्षिण गोव्यातील निकाल होता. मगोपसाठी हा हुरूप आणणारा निर्णय नक्कीच होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या मतदारसंघातील भाजपचा हा पराभव नक्कीच पक्षश्रेष्ठींना विचार करण्यास भाग पाडणारा आहे.
गेल्या निवडणुकीत पाऊसकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना केवळ दोन हजारांवर मते मिळविली होती. त्यामुळे यंदाचा त्यांचा विजय निश्चितच लक्षणीय ठरलेला आहे. गणेश गावकर यांना त्यांच्या पारड्यात जी मते पडण्याची अपेक्षा होती तेवढी मते उलट दीपक पाऊसकर यांच्या पारड्यात पडल्याने मतदारांनी मतदारसंघातील खाण उद्योग क्षेत्राच्या मंदीचा परिणाम दाखवून दिल्याची चर्चा मतदारसंघात चालू आहे.
कॉँग्रेसचे शंकर किर्लपालकर व अपक्ष बाळकृष्ण मराठे यांनी घोर निराशा केली. दीपक पाऊसकर यांना १४,५७४, गणेश गावकर यांना ९३५४, शंकर किर्लपालकर यांना ९९१ तर बाळकृष्ण मराठे यांना १५२ मते मिळाली.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना दीपक पाऊसकर म्हणाले की, गेल्या पाच वर्षांतील नैराश्य लोकांनी मतदानाद्वारे दाखवून दिले आहे. मगो पक्षाचे श्रेष्ठी आणि मतदार यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासास आपण पात्र ठरू, अशी कामगिरी येत्या पाच वर्षांत आपण करून दाखविणार आहे. खाण उद्योगाकडे मागील सरकारने केलेले दुर्लक्ष व त्यामुळे सावर्डे तसेच अन्य शेजारील भागातील अवलंबित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. सावर्डे प्रोगे्रसिव्ह फ्रंट या संघटनेचे त्यांनी खास आभार मानले.
(प्रतिनिधी)