सरकार 'कमिशन' मध्ये व्यस्त; विजय सरदेसाईंचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2024 09:37 AM2024-07-14T09:37:29+5:302024-07-14T09:38:20+5:30
राज्यातील भ्रष्टाचाराला दिल्लीचा आशीर्वाद
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील भाजप सरकार हे लोकशाही मानत नाही. महत्वाच्या विषयांकडे ते दुर्लक्ष करीत असून सरकार केवळ कमिशनमध्ये व्यस्त आहे. भाजप सरकारच्या या भ्रष्टाचाराला दिल्लीचा आशिर्वाद असल्याचा सणसणीत आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
राज्यातील विविध तालुक्यांत आपण जनता दरबार घेऊन जनतेने म्हणणे ऐकले. लोकांनी अनेक समस्या मांडल्या आहेत. या समस्या ऐकून सरकारला जनतेचे काहीच पडलेले नसून ते केवळ 'मनी की बात' करण्यातच व्यस्त असल्याची टीका सरदेसाई यांनी केली. जनता दरबार अंतर्गत गोवा फॉरवर्ड
पक्षाकडे २ हजार १७५ ई-मेल आले आहेत. यात जनतेने महागाई, विविध सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी कामगारांचा विषय, त्यांना सेवेत कायम करणे, भ्रष्टाचार, बेरोजगारी, सार्वजनिक तक्रार निवारणातील अपयश, म्हादई, खासगी उद्योगांमध्ये गोमंतकीयांना अपेक्षित रोजगार संधी नसणे, स्मार्ट सिटी, बेकायदेशीर भंगार अड्डे आदी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. तालुका स्तरावर वेगवेगळ्या समस्या असल्या तरी लोक या सरकारला कंटाळल्याचे स्पष्ट झाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
जनतेचे हे प्रश्न आपण पावसाळी अधिवेशनात मांडणार आहे. सरकार जर या विषयांची गंभीरपणे दखल घेत नसेल तर ते लोकशाही मानत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल. म्हादईप्रश्नी सरकारने शरणागती पत्करली आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवले, गोवा सरकार केवळ केंद्राला याविषयी पत्र लिहिण्यातच व्यस्त असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
नवा प्रादेशिक आराखडा करा
भू-जमीन रुपांतराचा विषय गाजत आहे. गोव्याचा प्रादेशिक आराखडा २०२१ अस्तित्वात नाही. सरकारने नवा प्रादेशिक आराखडा तयार करावा. पेडणे तालुक्यापासून त्याची सुरुवात करावी. प्रत्येक तालुक्याला तीन महिने द्यावेत. म्हणजे १२ तालुक्यांचा आराखडा तयार करण्यासाठी ३६ महिने लागतील. नवा प्रादेशिक आराखडा तयार करताना काही जमिनींचे अशंतः रुपांतर करावेच लागेल.
'सनबर्न'बाबत केवळ हवाच
सनबर्नचे आयोजन दक्षिण गोव्यात होईल ही केवळ हवा पसरवण्यात आली आहे. कारण आयोजकांनी दक्षिण गोव्यात त्याचे आयोजन होईल, असा कुठेही उल्लेख केलेला नाही. दक्षिण गोव्यात त्याला विरोध होईल हे स्पष्ट आहे. त्यामुळे पेडणेत जीएमआरने सनबर्नच्या आयोजनासाठी जागा दिली व सरकारने त्यास परवानगी दिली तर आश्चर्य वाटायला नको.
२०२७ मध्ये मते नाहीत
लोकभावनेनुसार काम करा, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्देश दिले आहेत. गडकरी यांनी भाजपला कानपिच्चक्या दिल्या आहेत. तसेच अप्रत्यक्षपणे त्यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला लोक मते देणार नाहीत, असेच सांगितले हे सिध्द होते. म्हणजेच काँग्रेसप्रमाणे तुम्हीही वागू नका, असा टोलाही देसाईंनी लगावला.