सरदेसाई सत्तेशिवाय राहू शकत नाहीत; युवा भाजपकडून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:08 AM2023-04-19T09:08:36+5:302023-04-19T09:09:46+5:30
म्हापशातील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत युवा अध्यक्ष समीर मांद्रेकर तसेच उत्तर आणि दक्षिण गोवा अध्यक्ष उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: आमदार विजय सरदेसाई हे सत्तेशिवाय राहू शकत नसल्याने सरकारवर त्यांनी फक्त टीका करण्याचे सत्र सुरू केले असल्याचा आरोप भाजप युवा समितीने केला आहे. त्यांनी केलेली विधाने उत्तर न देण्यासारखी असल्याने लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आली आहेत.
म्हापशातील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत युवा अध्यक्ष समीर मांद्रेकर तसेच उत्तर आणि दक्षिण गोवा अध्यक्ष उपस्थित होते. सरदेसाई यांच्याकडून केल्या जाणाऱ्या विधानावरून ते सत्तेपासून दूर राहू शकत नसल्याचे स्पष्ट होते, असे मांद्रेकर म्हणाले. ज्यावेळी ते सरकारमध्ये होते त्यावेळी सर्व काही चांगल्या पद्धतीने सुरू होते. पण सत्तेपासून दूर गेल्यावर सरकार वाईट कसे झाले, असाही प्रश्न करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. सरकारकडून सुरू असलेल्या कामे त्याला पहावत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवडून येण्याचे आवाहन देणाऱ्या सरदेसाई यांनी पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असेही आवाहन त्यांना करण्यात आले. सरदेसाई यांच्या टीकेकडे लोकांनी दुर्लक्ष करावे, असाही सल्ला यावेळी देण्यात आला.
विजय सरदेसाई यांचे मुख्यमंत्र्याना आव्हान
गोव्यात यापुढे गोवा फॉरवर्डचा एकही आमदार निवडून येणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करीत आहे. हिंमत असल्यास त्यांनी साखळी मतदारसंघात राजीनामा द्यावा. आपण फातोर्डा मतदारसंघाचा राजीनामा देतो. साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यानी पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान आमदार विजय सरदेसाई यांनी दिले आहे.
फातोर्डा मतदारसंघात पालिका प्रभागातील विकासकामांना जिल्हा संकुलाजवळ मंगळवारी संध्याकाळी प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा व इतर नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री सरकारी यंत्रणांच्या सहकार्याने निवडून आलेले आहे, अशी टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"