सरकारमध्ये सुदिनपेक्षा मनोहर पर्रीकरांना विजय लाडके?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 01:38 PM2018-09-21T13:38:20+5:302018-09-21T13:42:18+5:30
ज्याच्या हाती ससा तो पारधी अशा प्रकारची स्थिती राजकारणात असते. सध्या मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सहा आमदारांची मोट असल्याने विद्यमान अस्थिरतेच्या स्थितीत मगोपाचे ज्येष्ठ नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यापेक्षा गोवा फॉरवर्डचे नेते व कृषी मंत्री विजय सरदेसाई हे पर्रीकरांना जास्त जवळचे वाटू लागले आहेत.
- सदगुरू पाटील
पणजी : ज्याच्या हाती ससा तो पारधी अशा प्रकारची स्थिती राजकारणात असते. सध्या मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सहा आमदारांची मोट असल्याने विद्यमान अस्थिरतेच्या स्थितीत मगोपाचे ज्येष्ठ नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यापेक्षा गोवा फॉरवर्डचे नेते व कृषी मंत्री विजय सरदेसाई हे पर्रीकरांना जास्त जवळचे वाटू लागले आहेत. सरदेसाई यांनी दबावाचे राजकारण केले तरी, र्पीकर यांच्यासाठी सरदेसाई हे तूर्त लाडके बनले आहेत, असा अंदाज भाजपच्या एका गटाला आलेला आहे.
गोवा फॉरवर्ड हा पक्ष गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधी भावनेवर स्वार होऊन विधानसभेत पोहोचला. गोवा फॉरवर्डचे एकूण तीन उमेदवार जिंकले व फॉरवर्डने काँग्रेसला जोरदार धक्का देत भाजपासोबत सरकार स्थापन केले. काँग्रेसने 2017 च्या निवडणुकीवेळी सरदेसाई यांच्याविरोधात अचानक आपला उमेदवार उभा केला होता. त्याचा वचपा सरदेसाई यांनी काढला. पर्रीकर हे जर केंद्रातील संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्यात मुख्यमंत्री म्हणून येत असतील तरच आम्ही भाजपासोबत आहोत, असे सरदेसाई यांनी जाहीर करून आपल्या पर्रीकर प्रेमाची पहिली झलक दाखवली. सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डच्या तिन्ही आमदारांना मंत्रिपद मिळायला हवे, अशी मागणी केली व ती मागणी मनोहर पर्रीकर यांना व भाजपाला मान्य करावी लागली. एकेकाळी पर्रीकर सरकारमध्ये फ्रान्सिस डिसोझा यांना जे महत्त्व असायचे ते महत्त्व पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारमध्ये सरदेसाई यांना प्राप्त झालेले आहे. मंत्री सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्री असले तरी, त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता ताबा दिला जाऊ नये अशी मागणी सरदेसाई यांनी केली व पर्रीकर यांना ती मागणी मान्य करावी लागली.
मंत्री सरदेसाई यांनी सरकारमध्ये आपले वजन टप्प्याटप्प्याने वाढवत नेले व पर्रीकर यांचा विश्वास संपादन करण्यातही ते गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत यशस्वी ठरले. आता तर त्यांनी आम्ही गोव्यात नेतृत्व बदल मागितला नव्हता, असे जाहीर केले आहे. गोव्यातील नेतृत्वाच्या वादावर कायमस्वरुपी तोडगा हवा असे सरदेसाई यांनी यापूर्वी म्हटले होते. पर्रीकर हे दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेत असून तेथून त्यांनी गोव्यात कुठल्याच मंत्र्याला फोन केला नव्हता पण मंत्री सरदेसाई यांनाच पर्रीकर यांनी गुरुवारी रात्री फोन केला व त्यांच्याशी संवाद साधला. मंत्री सरदेसाई यांच्या इच्छेनुसार सर्व काही घडेल असे संकेत पर्रीकर यांनी सरदेसाई यांना दिले, अशी माहिती भाजपाच्या आतिल गोटातून मिळाली.
सरदेसाई यांनी काँग्रेसशी पूर्ण शत्रूत्व घेतलेले असल्यानेही पर्रीकर यांनी सरदेसाई यांना खूश ठेवले आहे. शिवाय गोवा सरकार स्थिर ठेवायचे असल्याने पर्रीकर यांना सरदेसाई यांचीच जास्त गरज आहे. कारण त्यांच्याकडे आता सहा आमदारांचे बळ आहे. पर्रीकर येत्या आठवड्यात आपल्याकडील काही खात्यांचे वाटप करणार आहे. त्यावेळीही सरदेसाई यांना झुकते माप मिळू शकते. सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद निर्माण केले जाऊ नये अशी सरदेसाई यांची इच्छाही पर्रीकर पूर्ण करू शकतात, अशी चर्चा आहे.