भाजपाच्या बैठकीत विनय तेंडुलकरांची भूमिका स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 09:19 PM2018-10-24T21:19:35+5:302018-10-24T21:19:49+5:30
काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे देणे आणि भाजपामध्ये प्रवेश करणे व त्यावेळपासून सुरू झालेला लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा वाद याबाबतची सगळी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी पक्षाच्या बैठकीत मांडली.
पणजी : काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे देणे आणि भाजपामध्ये प्रवेश करणे व त्यावेळपासून सुरू झालेला लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा वाद याबाबतची सगळी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी पक्षाच्या बैठकीत मांडली. घटनाक्रम त्यांनी सांगत स्वत:ची भूमिका स्पष्ट केली.
लोकसभा निवडणुकीवेळी व शिरोडा आणि मांद्रेतील पोटनिवडणुकीवेळी पक्ष संघटना मजबूत असावी या हेतूने बुधवारी भाजपच्या राज्यस्तरीय पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी तेंडुलकर यांनी सगळे विषय मांडले. भाजपाचे संघटन मंत्री विजय पुराणिक हे या बैठकीला उपस्थित होते. या शिवाय मंत्री निलेश काब्राल, सदानंद शेट तानावडे, सुलक्षणा सावंत, दत्तप्रसाद नाईक, सत्यविजय नाईक आदींनी बैठकीत भाग घेतला. जिथे संघटना कमकुवत वाटते, तिथे ती मजबूत करावी असे बैठकीत ठरले. मडगावमध्ये सर्व मतदारसंघांच्या कोअर टीमच्या प्रमुखांची बैठक बुधवारीच घेण्यात आली. खनिज खाणी लवकर सुरू कराव्यात अशी मागणी काब्राल यांनी बैठकीत केली.
मनोहर पर्रीकर कामावर येणार ?
मनोहर पर्रीकर सध्या दोनापावल येथील त्यांच्या निवासस्थानीच आहेत. तेंडुलकर यांनी बैठकीनंतर लोकमतला सांगितले, की येत्या दिवाळीवेळी मनोहर पर्रीकर कामावर रूजू होतील. मनोहर पर्रीकर यांनी तसे आम्हाला यापूर्वी सांगितलेले आहे. मगो पक्षाने फक्त आठ-दहा दिवसांचीच कळ सोसावी. पक्षाचे केंद्रीय नेतृत्वही मगोपशी चर्चा करील. सध्या सरकारी कामाची गती थोडी मंदावलेली दिसते पण मनोहर पर्रीकर रुजू होताच कामांवा वेग येईल. सरकारमधील अन्य मंत्री सक्षम आहेत.
..म्हणे भंडारी सीएम...
दरम्यान, भंडारी समाजातील सर्वपक्षीय आजी-माजी आमदारांची पर्वरी येथे मंगळवारी रात्री बैठक झाली. अशोक नाईक यांना समाजाचे अध्यक्ष करावे असे ठरविण्यासाठी ती बैठक होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री हा भंडारी समाजातीलच असावा अशी मागणी करावी असे काही ठरलेले नाही, असे बैठकीत सहभागी झालेले दत्तप्रसाद नाईक व इतरांनी सांगितले. मंत्री जयेश साळगावकर यांनीही तसेच सांगितले. ती चर्चा राजकीय नेतृत्व ठरविण्यासाठी नव्हती असे साळगावकर म्हणाले. समाजाच्या काही सदस्यांना श्रीपाद नाईक हे यापुढे मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यामुळे भंडारी सीएम असावा या मागणीसाठी बैठक बोलावली गेली अशी चर्चा पसरली होती पण त्यात तथ्य नाही असे काही सदस्यांनी सांगितले.