आचारसंहिता उल्लघंन, आपच्या आमदार वेंझी यांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2024 05:55 PM2024-04-09T17:55:24+5:302024-04-09T17:57:25+5:30
दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कथित आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क, मडगाव : आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) बाणावलीचे आमदार, कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांना दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कथित आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावलेल्या या नोटिशीनुसार, आमदार व्हिएगस यांनी ६ एप्रिल रोजी संबधीत अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता कुडचडे येथे इंडिया अलायन्स बॅनरखाली झालेल्या सार्वजनिक कोपरा बैठकीत लाऊडस्पीकरचा वापर केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आमदार वेंझी यांना पुढील ४८ तासांत कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आमदार व्हिएगस यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी निवडणूक आयोगाची ही कारवाई म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.