वाहतूक नियमांचे उल्लंघन, ६० लाखांचा दंड वसूल; दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांची कारवाई!

By पंकज शेट्ये | Published: December 24, 2023 07:05 PM2023-12-24T19:05:20+5:302023-12-24T19:05:31+5:30

दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेर एका वर्षात दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांनी ११ हजार ३२६ जणांना पकडून त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली.

Violation of traffic rules, fine of Rs. 60 lakhs; Daboli airport traffic police action! | वाहतूक नियमांचे उल्लंघन, ६० लाखांचा दंड वसूल; दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांची कारवाई!

वाहतूक नियमांचे उल्लंघन, ६० लाखांचा दंड वसूल; दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांची कारवाई!

वास्को: दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते २२ डिसेंबरपर्यंत वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ६० लाख ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेर एका वर्षात दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांनी ११ हजार ३२६ जणांना पकडून त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली.

दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेर वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी तेथे स्वतंत्र असे दाबोळी विमानतळ वाहतूक पोलीस स्थानक स्थापित आहे. दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेरील प्रवेश द्वारापासून बाहेर जाण्याच्या द्वारापर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच येथे वाहतूक नियंमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस कडकरित्या नजर ठेवतात. 

गेल्या एका वर्षात विमानतळ वाहतूक पोलीसांनी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेर वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या ११ हजार ३२६ दुचाकी, चारचाकी इत्यादी वाहन चालकांना दंड देऊन ६० लाख ७ हजार ५०० रुपयांची रक्कम वसूल केली. एका वर्षात दाबोळी विमानतळ वाहतूक पोलीसांनी ‘नो पार्कींग’ मध्ये वाहन उभे केलेल्या ३१९१ जणांना दंड दिला आहे. चारचाकीच्या दरवाजाच्या काचा टिंट(काळ्या) केलेल्या २५५५ जणांना दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांनी एका वर्षात दंड वसूल केला आहे. 

तसेच दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांनी वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ९५ जणांना दंड देण्याबरोबरच त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना काही महिन्यासाठी निलंबित करण्याकरिता ताब्यात घेऊन वाहतूक विभागाच्या कार्यालयात पाठवला आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या ४९ जणांना दंड देण्याबरोबरच त्यांचा वाहन परवाना ताब्यात घेऊन काही महीन्यासाठी निलंबित करण्याकरिता वाहतूक विभागाच्या कार्यालयात पाठवून दिला. 

मोबाईलवर बोलणाऱ्या ३२ जणांना, ट्रीपलसीट दुचाकी चालवणाऱ्या ६ जणांना, दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या ४ जणांना आणि खासगी चारचाकी सेल्फवर चालवण्यासाठी दिलेल्या ४ जणांना दंड देऊन त्यांचे परवाने काही महीन्यासाठी निलंबित करण्याकरिता वाहतूक विभागाच्या कार्यालयात पाठवले आहेत. दाबोळी विमानतळावर दररोज प्रवासी - पर्यटकांची मोठी ये - जा चालू असते. त्यांना सोडण्यासाठी - नेण्यासाठी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात टॅक्सी इतर वाहनांची गर्दी असते. 

दाबोळी विमानतळ वाहतूक पोलीस स्थानकावर अधिकारी - कर्मचारी मिळून १९ जण कार्यरत असून त्यांच्याकडून विमानतळाबाहेरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उत्तम प्रकारे काम केले जाते. दाबोळी विमानतळ वाहतूक पोलीस निरीक्षक राहूल धामशेकर यांच्याशी चर्चा केला असता विमानतळाबाहेरील वाहतूक व्यवस्था सतत सुरळीत रहावी यासाठी आमचे अधिकारी - कर्मचारी उत्तम काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विमानतळाबाहेर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी - कर्मचारी कडकरित्या नजर ठेवतात असे ते म्हणाले.

Web Title: Violation of traffic rules, fine of Rs. 60 lakhs; Daboli airport traffic police action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा