व्हायरल सत्य: मनोहर पर्रीकरांचे भाऊ खरंच किराणा मालाचं दुकान चालवतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:29 PM2019-03-23T12:29:54+5:302019-03-23T12:32:16+5:30
मनोहर पर्रीकर यांच्या साधेपणाचं कौतुक होत असतानाच, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला.
देशाचे संरक्षणमंत्री म्हणून आणि गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवला. म्हणूनच, त्यांच्या निधनाची बातमी सर्व देशवासीयांना चटका लावून गेली. 'राजकारणाच्या दलदलीतील कमळ' असा त्यांचा उल्लेख झाला, शालीन नेता गमावल्याची भावना व्यक्त झाली, त्याला कारण होती, त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी. मुख्यमंत्री असतानाही स्कूटरवरून फिरणाऱ्या, स्वतः बाजारात जाणाऱ्या, आपल्या खासगी कामांसाठी पदाचा किंवा यंत्रणेचा वापर न करणाऱ्या पर्रीकरांनी जनतेच्या मनात आदराचं स्थान मिळवलं होतं. त्यांच्या या साधेपणाचं कौतुक होत असतानाच, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला.
किराणा मालाच्या दुकानात एक व्यक्ती बसलीय, असा तो फोटो होता. त्यासोबत, 'हे आहेत मनोहर पर्रीकर यांचे भाऊ. आजही ते गोव्यात किराणा मालाचं दुकान चालवतात', असा मेसेजही होता. परंतु, हल्ली सोशलवर बरेच फेक फोटो, फेक मेसेज व्हायरल होत असल्यानं काहींच्या मनात या फोटोच्या सत्यतेबद्दल शंकाही निर्माण झाली होती. हा 'प्रोपोगँडा' असल्याचा प्रचारही झाला होता. म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने, हा फोटो खरा की खोटा याची खातरजमा थेट गोव्यातील जुन्या-जाणत्या रहिवाशांकडून करून घेतली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ चहाचा स्टॉल चालवत असल्याचा फोटो मागे सोशल मीडियावर फिरला होता. त्यातील व्यक्तीचा चेहरा आदित्यनाथ यांच्याशी मिळताजुळता होता. आदित्यनाथ यांचा साधेपणा दाखवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी हा फोटो व्हायरल केला होता. परंतु, मनोहर पर्रीकर यांच्या भावाचा - सुरेश पर्रीकर यांचा किराणा मालाच्या दुकानातील फोटो 'शत प्रतिशत' खरा आहे.
हा फोटो व्हायरल करून भाजपा लोकांना मूर्ख बनवत असल्याचा दावा काही विरोधकांनी केला होता. पर्रीकर कुटुंबाचा कोट्यवधींचा व्यापार आहे, २०१४ मध्ये त्यांच्याकडे साडेतीन कोटी रुपये होते, असे मेसेज काहींनी केले होते.
मात्र, अनेक वर्षांपासून म्हापसा इथल्या बाजारात पर्रीकर कुटुंबाचं किराणा मालाचं दुकान असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. गोपाल कृष्ण प्रभू पर्रीकर नावाचं हे दुकान आधी मनोहर पर्रीकर यांचे वडील चालवत. त्यानंतर सुरेश पर्रीकर यांनी दुकानाची सूत्रं स्वीकारली. गोव्यातील जुन्या रहिवाशांनी, मनोहर पर्रीकरांनाही अनेकदा या दुकानात पाहिलं आहे. त्यामुळे या फोटोबद्दलच्या सर्व शंकाकुशंकांवर पडदा पाडायला हरकत नाही.