ओडीपीप्रश्नी विश्वजित आक्रमक; भाजप कोअर कमिटी बैठकीत बाबूशवर अप्रत्यक्षरीत्या साधला निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 09:38 AM2024-07-11T09:38:28+5:302024-07-11T09:39:02+5:30
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या कोअर टीमची बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : विविध शहरे व भागांच्या ओडीपी म्हणजेच बाह्यविकास आराखड्यांमध्ये आपण स्वतःहून कुठेच हस्तक्षेप करत नाही. मंत्री किंवा आमदार जसे सांगतात त्यानुसार आपण काही कामे करून देतो. पण काही मंत्री आपल्या अनुपस्थितीत उगाच अपप्रचार करतात, अशी खंत मंत्री विश्वजित राणे यांनी काल बैठकीत व्यक्त केली व अप्रत्यक्षरीत्या महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल भाजपच्या कोअर टीमची बैठक घेतली. म्हापशात झालेल्या या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व अन्य पदाधिकारी तसेच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दिगंबर कामत, माजी मंत्री विनय तेंडुलकर, दत्ता खोलकर, दामू नाईक, नरेंद्र सावईकर, संजीव देसाई आदी उपस्थित होते.
नगर नियोजन खात्याचे मंत्री या नात्याने विश्वजित ओडीपींबाबत बोलले. 'मी गेल्या एक-दोन बैठकांना पोहोचलो नाही, तेव्हा मुख्यमंत्र्यांसमोर ओडीपींच्या विषयावरून दोन मंत्री माझ्या विरोधात बोलले. काहीजण मुद्दाम गैरसमज निर्माण करू पाहतात. काही मंत्र्यांना मी ओडीपीसाठी रान मोकळे करून द्यायला हवे तर तसे सांगा. मी कुठेच ओडीपीत हस्तक्षेप केलेला नाही', असे बैठकीत विश्वजित बोलले.
मुख्यमंत्री सावंत यांनी शांतपणे राणे यांचे म्हणणे ऐकून घेतले. मी ज्येष्ठ मंत्री असल्याने माझ्याविरोधात ओडीपीविरुद्ध बाबूश वगैरे बोलताना त्यांना बैठकीत बोलण्यापासून थांबवायला हवे. समोरासमोर बोला, असे मुख्यमंत्र्यांनी जर त्या मंत्र्यांना सांगितले तर बरे होईल. माझ्यासमोर बोला किंवा तक्रार करा, मी हस्तक्षेप करतच नाही, असे विश्वजित म्हणाले. इथे दिगंबर कामतही उपस्थित आहेत. मी त्यांच्या मडगाव ओडीपीमध्ये कधी हस्तक्षेप किंवा फेरफार केलाय ते मला सांगावे, पर्वरीबाबतही मी कधीच काही केले नाही. जर मी फेरफार करतोय तर मंत्र्यांनी माझ्या उपस्थितीतच मुख्यमंत्र्यांना तसे सांगावे असे विश्वजित बोलले.
अधिवेशन, गडकरी दौऱ्याचा आढावा
दरम्यान, आगामी विधानसभा अधिवेशन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गोवा दौरा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातील आढावा यावेळी घेण्यात आला. आगामी काळात लोकसभा निवडणुकीत मतदारांचे आभार मानण्यासाठी कार्यकत्यांच मेळावे घेतले जाणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली. मंत्रिमंडळातील फेरबदल तसेच इतर कोणत्याच विषयावर चर्चा बैठकीत झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजपच्या पुढील वाटचालीसंबंधी आगामी विधानसभा अधिवेशन तसेच इतर काही मुद्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचे तानावडे म्हणाले. तर भाजपच्या होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीसंदर्भात आढावा घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांना दिली.
'लोकमत'मधील फोटो गाजला; रस्त्यांवरील खड्डे बुजवणार
दरम्यान, भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'मधील फोटोचा विषय बैठकीत मांडला. तो फोटो बैठकीत दाखवला व स्मार्ट सिटीतदेखील महत्त्वाच्या रस्त्यांवर असे खड्डे असतील तर ते लगेच बुजवावेत असे सुचविले. पणजीचा फोटो काल 'लोकमत' मध्ये आलाय व तो खूप व्हायरल झालाय, असे एक ज्येष्ठ पदाधिकारी बैठकीत बोलले. त्यावेळी सर्व खड्डे बुजविले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मालपे येथे दरड कोसळत आहे. एम व्ही राव या • कंत्राटदाराविरुद्ध आणखी किती सहन करायचे असा प्रश्न एका सदस्याने केला. मुख्यमंत्री लगेच सायंकाळी मालपे येथे जाऊन आले. कला अकादमीचे चित्रही स्पष्ट करायला हवे, असे एक सदस्य बोलले.