विश्वजित, दिव्यामुळे श्रीपादना मोठे बळ; निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2024 10:45 AM2024-05-05T10:45:21+5:302024-05-05T10:47:23+5:30

पर्ये, वाळपईसह उसगावमध्ये अनेक बैठका व सभा

vishwajit rane and divya rane give strength to shripad naik in north gao lok sabha election 2024 | विश्वजित, दिव्यामुळे श्रीपादना मोठे बळ; निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा 

विश्वजित, दिव्यामुळे श्रीपादना मोठे बळ; निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा 

लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी : लोकसभा निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. उत्तर गोवा मतदारसंघात काँग्रेसचे रमाकांत खलप यांनी पेडणे व बार्देशवर प्रचाराचा भर दिलाय, तर भाजपने डिचोली तालुका, सत्तरीचे दोन मतदारसंघ, तसेच प्रियोळवर प्रचाराचा भर दिला आहे. भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना सत्तरी तालुका हा दरवेळी मोठा आधार ठरत आला आहे.

यावेळी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीवेळी पर्ये मतदारसंघदेखील भाजपच्या आमदाराकडे आहे. पूर्ण सत्तरी तालुका भाजपच्या आमदारांकडे आहे. वाळपईत मंत्री विश्वजित राणे व पर्यंत आमदार डॉ. दिव्या राणे यांच्याकडे सूत्रे आहेत. विश्वजित व दिव्या यांनी दोन्ही मतदारसंघांमध्ये गेले दीड महिना अनेक सभा व बैठका घेतल्या. सत्तरी म्हणजे मोदी का परिवार अशा घोषणा विश्वजित यांचे कार्यकर्ते देत आहेत. सत्तरी तालुक्यातून बरीच मते यावेळीही आपल्याला मिळतील असा श्रीपाद नाईक यांना विश्वास आहे.

दिव्या व मंत्री विश्वजित यांनीही तसाच विश्वास व्यक्त केला आहे. डिचोली तालुक्यात तीन मतदारसंघ असले तरी, सत्तरीतील दोन मतदारसंघांत आतापर्यंत बहुतेक बैठका झाल्या. शिवाय पूर्वी दिव्या राणे यांनी अनेक महिला मेळावे व हळदी कुंकू सोहळे घेतले होते. या तालुक्यात काँग्रेस व आरजीचीही काही प्रमाणात मते आहेतच. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी हे दिसून आले.

श्रीपाद नाईक यांनी दोन वेळा सत्तरी तालुक्याला भेट दिली. काँग्रेसचे उमेदवार खलप यांनी वाळपई मतदारसंघाला दोन वेळा धावती भेट दिली. सत्तरीत आता काँग्रेसचे कार्यकर्ते संख्येने कमी आहेत. याची कल्पना खलप यांनाही आली. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली आहे. त्यामुळे तेही आता आपल्या साखळीतील घरीच असतात.

मंत्री विश्वजित यांनी यावेळी उसगावमध्ये जास्त सभा, बैठका घेण्याचे सत्र आरंभिले आहे. उसगावमधील रुसवेफुगवेही दूर करण्याचा प्रयत्न केला. अलीकडेच तिस्क येथे झालेल्या सभेला मोठी गर्दी होती. या सर्व गर्दीचे, कार्यक्रमांचे व सभा बैठकांचे फोटो व माहिती विश्वजित यांच्याकडून दिल्लीत पक्षश्रेष्ठींनाही सातत्याने पाठवली जात आहे. राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना रोज माहिती दिली जात आहे.

 

Web Title: vishwajit rane and divya rane give strength to shripad naik in north gao lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.