विश्वजीतची दिल्लीत बैठक; बी.एल. संतोष यांच्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2024 12:34 PM2024-09-14T12:34:56+5:302024-09-14T12:36:40+5:30
सिंधुदुर्गातील आठ मतदारसंघांचा प्राथमिक अहवालही दिला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांची काल, शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांशी बैठक झाली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी त्यांची अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. गोव्यातील राजकारण व काही महत्त्वाच्या विषयांबाबत विश्वजीत राणे यांच्याकडून संतोष यांनी सद्यःस्थिती जाणून घेतली.
मंत्री राणे यांच्यावर सिंधुदुर्गातील आठ मतदारसंघांची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनिमित्ताने राणे यांच्याकडे आठ मतदारसंघ सोपविण्यात आले आहेत. त्याबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे कामही काल राणे यांनी दिल्लीत केले. भाजपच्या मुख्यालयात ते बी. एल. संतोष यांना भेटले.
यापुढील काळात मंत्रिमंडळ फेररचना होणार काय, तसे असेल तर नेमकी फेररचना कशी असू शकते याविषयी दिल्लीत चर्चा झाल्याचे पक्ष सुत्रांनी सांगितले. गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांची कामगिरी कशी राहिली व सरकारमधील काही मंत्र्यांची कामगिरी कशी होती याबाबतही संतोषजींनी राणे यांच्याकडून माहिती जाणून घेतल्याचे समजते. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होईपर्यंत गोव्यात कोणतेच बदल होणार नाहीत अशी चर्चा आता गोवा मंत्रिमंडळात सुरू झाली आहे.