विश्वजित राणे यांची भूमिका महत्त्वाची; विरोधक अद्यापही विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 10:48 AM2024-02-08T10:48:37+5:302024-02-08T10:49:28+5:30

सत्तरी तालुक्यात भाजपच्या तुलनेत विरोधक संघटन बांधणीत अपयशी

vishwajit rane role is important in lok sabha election 2024 | विश्वजित राणे यांची भूमिका महत्त्वाची; विरोधक अद्यापही विस्कळीत

विश्वजित राणे यांची भूमिका महत्त्वाची; विरोधक अद्यापही विस्कळीत

दशरथ मांद्रेकर, लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई : सत्तरी तालुक्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असुन ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमवलेली गर्दी पाहता लोकसभा निवडणुकीच्या तयारीची सुरू झाला आहे. २०१९मधील निवडणुकीत भाजपला चांगले मताधिक्य मिळाले होते. मागील लोकसभा निवडणुकीत सत्तरी तालुक्यात भाजपचे श्रीपाद नाईक व काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांच्या लढत झाली होती. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणुक होती. यापुर्वी विश्वजित राणे हे काँग्रेस पक्षाला मताधिक्य देताना दिसत होते पण भाजपा प्रवेशानंतर चित्र वेगळे निर्माण झाले.

२०१९मध्ये पर्ये मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार असताना देखील भाजपाला १० हजार पेक्षाअधिक मताधिक्य मिळाले होते. तर वाळपईत मात्र पर्ये पेक्षा कमी मताधिक्य मिळाले होते. पण यावेळी मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पर्येमधून डॉ. दिव्या राणे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. पण वाळपईत मात्र उमेदवारांची गर्दी झाल्याने मत विभागणी झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विरोधी मते भाजपाच्या विरोधात राहतील का नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. पर्ये मतदारसंघातही तेच चित्र पाहायला मिळणार आहे. त्यात गेली अनेक वर्षे नाईक या मतदारसंघामध्ये निवडून येत आहे. त्यामुळे काही मतदार नाराजी व्यक्त करताना दिसतात. तर काही विरोधी मतदार पक्ष गृहीत न धरता श्रीपाद नाईक यांच्या स्वभावासाठी मतदान करीत असल्याचे सांगतात.

जर भाजपाने विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना पुन्हा उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार कोण असणार याबद्दलही चर्चा सुरू आहे. सत्तरी तालुक्यात नाईक यांचा चांगला परिचय आहे. काँग्रेस पक्षाने जर नवख्या उमेदवारांना संधी दिली तर विजय भिके यांना संधी मिळु शकते. पण त्यांना त्यासाठी सत्तरी तालुक्यात परिचय देण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल.

काँग्रेस पक्षाने जर रमाकांत खलप यांना संधी दिली तर ते यापूर्वी उत्तर गोव्यात निवडून आले आहे तसेच ते केंद्रीय मंत्रीही होते. त्यांचा मगो पक्षात असताना सत्तरीत चांगला संपर्क होता. त्यामुळे भाजपा विरोधक त्यांच्या अनुभवाकरीता त्यांना मतदान करु शकतात. वाळपई व पर्ये मतदारसंघात आरजीने विधानसभा निवडणुकीत चांगले मतदान मिळवले होत. त्यांचे उमेदवार मनोज परब दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तर पर्येत आरजी तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. यावेळीही तीच स्थिती निर्माण होऊ शकते.

दुसरीकडे सत्तरी तालुक्यात आरोग्यमंत्री राणे यांचा दबदबा पाहता दोन्ही मतदारसंघात भाजपा विश्वजित राणे यांच्या भरोसे आहे. त्यात पर्ये मतदारसंघात डॉ. दिव्या राणे आमदार बनल्यानंतर चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर विरोधकांनाही आपल्या कामाकडे आकर्षित केले आहे. त्यामुळे त्या मतदारसंघात त्यांना मिळालेले मताधिक्य पेक्षा जास्त मताधिक्य लोकसभा निवडणुकीत मिळु शकते.

विरोधक अद्यापही विस्कळीत

वाळपई व पर्ये मतदारसंघात विरोधक विस्कळीत असल्याचे चित्र आहे. पर्येतून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी मागील निवडणूक लढविलेली नाही. त्यानंतर तेथे काँग्रेसचे काम काहीच नाही. काँग्रेसचे मतदार आहेत पण एकही नेता नाही. पर्ये मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, आरजी, शिवसेना या पक्षांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे मत विभागणी होऊन डॉ. दिव्या राणे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. वाळपई मतदारसंघातही तशीच स्थिती आहे. विरोधक विखुरलेले आहेत त्यामुळे मंत्री राणे यांचा दबदबा कायम राहू शकतो. वाळपई मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे कामच दिसत नाही. सत्तरीत विरोधक कोणाला मतदान करतील त्यावरच भाजपाला मताधिक्य किती मिळेल हे दिसणार आहे.

 

Web Title: vishwajit rane role is important in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा