"विश्वजित राणेंनी सरकारमधून बाहेर पडून आपण खरा मराठा हे सिद्ध करावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 03:47 PM2021-01-13T15:47:31+5:302021-01-13T16:01:52+5:30

Vishwajit Rane News : सत्तरीच्या लोकभावनेची कदर कदर करीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आयआयटी फक्त शेळ मेळावलीतच नव्हे तर सत्तरीत कुठेही नको अशी जी भूमिका घेतली आहे तिचे स्वागत करताना त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवावेत

Vishwajit Rane should come out of the government and prove that he is a true Maratha | "विश्वजित राणेंनी सरकारमधून बाहेर पडून आपण खरा मराठा हे सिद्ध करावे"

"विश्वजित राणेंनी सरकारमधून बाहेर पडून आपण खरा मराठा हे सिद्ध करावे"

Next

मडगाव - सत्तरीच्या लोकभावनेची कदर कदर करीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आयआयटी फक्त शेळ मेळावलीतच नव्हे तर सत्तरीत कुठेही नको अशी जी भूमिका घेतली आहे तिचे स्वागत करताना त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवावेत अन्यथा या सरकारातून बाहेर पडून आपण खरे मराठा हे सिद्ध करावे असे आव्हान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले आहे.

फातोर्डा येथे विकासकामांची सुरवात करताना सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सध्याचे भाजप सरकार आपल्या लोकविरोधी निर्णयामुळे लोकांमध्ये बदनाम होत चालले आहे. अशा सरकारात राणे सारख्या धडाडीच्या नेत्यांना भवितव्य उरलेले नाही. या पक्षात राहणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. राणे हे फॉरवर्ड जाणारे नेते आहेत त्यामुळे सरकारातून बाहेर पडल्यास त्यांचे कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही असे सूचक उद्गार सरदेसाई यांनी काढले.

सोमवारी धर्मापूर नावेली येथे झालेल्या एका कार्यक्रमात  भाजप सरकारातील मंत्री मायकल लोबो आणि फिलिप नेरी रोड्रिक्स यांनी रेल्वे दुपदरीकरणा संदर्भात लोकांना जे काय हवे तेच होणार असे जे वक्त्यव्य केले आहे त्याचीही दखल घेताना सरदेसाई यांनी, आता मायकल आणि फिलीपलाही हे सरकार लोकविरोधी हे कळून चुकले आहे. हे सावंतवाडीचे सरकार गोवेकरांना न्याय देऊ शकणार नाही याची त्यांनी जाणीव ठेवावी असे सांगून, फक्त वक्तव्ये करून चालणार नाहीत राणे यांच्या सारखे पत्र लिहून लोकांना रेल्वे दुपदरीकरण आणि कोळशाची वाहतूक नको हे सांगा असा सल्ला दिला.

मडगावच्या सोनसोडो कचरा प्रकल्पाबाबत आता पालिका निवडणुकीनंतर निर्णय घेण्यात येईल असे घन कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी म्हटले आहे. त्याचा समाचार घेताना सरदेसाई म्हणाले, सरकारला सोनसोडो पालिका निवडणुकीचा मुद्दा करायचा आहे का? घन कचरा व्यवस्थापन महामंडळाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच या जागेत बायो मिथेनेशन प्रकल्प बसविण्यासाचा निर्णय मडगाव पालिकेने घेतला. या महामंडळाला सर्व ते सहकार्य दिले. एवढेच नव्हे तर स्वतःचा निधीही महामंडळाला देण्याची तयारी दाखविली. या महामंडळाचे मुख्यमंत्री स्वतः अध्यक्ष आहेत. लोबो उपाध्यक्ष आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या महामंडळाने  पाठविलेली फाईल नगरविकास मंत्री मिलिंद नाईक पास करत नाहीत. त्यांना जे सुटले पाहिजे ते सुटत नाही म्हणून ते भलतेच तंत्रज्ञान आणू पाहतात. महामंडळाच्या तज्ज्ञांनी ज्या तंत्रज्ञानाला मान्यता दिली आहे त्याची तांत्रिक मंजुरी अर्धशिक्षित असेलेले मंत्री नाईक कशी अडवून धरू शकतात असा सवाल केला.

मडगावच्या लोहिया मैदान सुशोभितीकरणाच्या कामाचेही आदेश त्या कंत्राटदाराकडून काही न सुटल्यामुळेच आतापर्यंत दिले गेलेले नाहीत. यावर आपण येत्या अधिवेशनात प्रश्नही घातला आहे. त्यामुळे हा प्रश्न चर्चेला येण्यापूर्वी या कामाचा आदेश त्या कंत्राटदाराला मिळेल याची आपल्याला खात्री आहे असे सांगत सोनसोडो प्रश्नही अधिवेशनात आणावा अशी सरकारची इच्छा आहे का असा सवाल त्यांनी केला.

 

Web Title: Vishwajit Rane should come out of the government and prove that he is a true Maratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.