दृष्टी लाइफ सेव्हिंगची जुने गोवे-पणजी,बायणा-पणजी बोटसेवा येत्या महिन्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 07:28 PM2017-10-17T19:28:01+5:302017-10-17T19:28:14+5:30
गोव्यातील किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाऱ्या मुंबईतील दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीने येथे विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.
पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाऱ्या मुंबईतील दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीने येथे विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या महिन्यापासून जुने गोवे ते पणजी आणि बायणा, विमानतळ फेरी टर्मिनल(एएफटी) ते पणजी अशी ४0 आसनी आलिशान बोटसेवा सुरु केली जाणार असून पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरणार आहे.
जुने गोवे ते पणजी प्रवासाकरिता रु १00 तर बायणा, विमानतळ फेरी टर्मिनल(एएफटी) ते पणजी प्रवासासाठी रु. ८00 आकारले जातील.
या आलिशान बोटीत बसून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचे विहंगम दृश्य पर्यटक टिपू शकतील. दृष्टी टू आणि दृष्टी थ्री या नावाने असलेल्या या दोन आलिशान बोटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील व त्यांना पणजी, बागा, जुने गोवा, सिकेरीचा आग्वाद किल्ला, दाबोळी किनाऱ्यावरील आरामदायी आणि नयनरम्य यात्रा या बोटी घडवून आणतील. आलिशान बोटींमध्ये आरामदायी आसन व्यवस्था, प्रशस्त अंतर्गत सजावट, स्वच्छ बाथरूम, चार्जिंग पॉइंट्स आणि सुरक्षा बेल्टची सोय आहे. वातानुकुलित प्रवासी लाउंज आणि वेटींग एरिया, ऑन-बोर्ड बॅगेज सहाय्य सोबत मोफत व्हाय-फाय, पाकीटबंद अन्नपदार्थ व पेये उपलब्ध असतील. बोटीतील खलाशांसोबत जीवरक्षकही असतील. त्यांना बचावाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे दृष्टी मरीनचे सीईओ जी. रवी शंकर यांनी सांगितले.