गोवा भाजपाने मागितली आर्चबिशपांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 05:53 PM2018-06-07T17:53:43+5:302018-06-07T17:53:43+5:30
घटना धोक्यात आहे, मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, अशा काही अर्थाची गोव्याच्या आर्चबिशपांची विधाने सध्या चर्चेत असली तरी, येत्या दोन दिवसांत भाजपच्या गोवा प्रदेश पदाधिका-यांची व आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांची भेट होणार आहे.
पणजी : घटना धोक्यात आहे, मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, अशा काही अर्थाची गोव्याच्या आर्चबिशपांची विधाने सध्या चर्चेत असली तरी, येत्या दोन दिवसांत भाजपच्या गोवा प्रदेश पदाधिका-यांची व आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांची भेट होणार आहे. आर्चबिशपांची भेट गोवा भाजपने मागितली आहे. ती लगेच मिळेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
भाजपाने संपर्कसे समर्थन असा कार्यक्रम देशभर हाती घेतला आहे. देशातील सर्व धर्मीयांचे गुरू, निवृत्त न्यायाधीश, लष्करातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, निवृत्त बडे खेळाडू आदींना भेटण्याचा उपक्रम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुरू केला आहे. विविध नेत्यांना भेटून मोदी सरकारने गेल्या चार वर्षात काय केले याविषयीची माहिती दिली जात आहे. पुढील 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी सर्वाचा पाठिंबा मिळावा, असा त्यामागील उघड हेतू आहे. भाजपाने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरून तसे जाहीरही केले आहे.
शहा यांनी नुकतीच रामदेव बाबा, कपिल देव आदींची भेट घेतली. गोवा भाजपानेही संपर्कसे समर्थन कार्यक्रम गुरुवारी सुरू केला. कुंडई येथील तपोभूमीवर जाऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे, खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, खजिनदार संजीव देसाई आदींनी ब्रह्मेशानंद स्वामींची भेट घेतली. केंद्र सरकारच्या कामगिरीविषयी व योजनांविषयी स्वामींना माहिती दिली. गोवा राज्याला मोदी सरकारचा काय फायदा झाला त्याविषयीही भाजप पदाधिका-यांनी ब्रह्मेशानंद स्वामींना माहिती दिली. मोदी सरकारमुळे जगात अनेक ठिकाणी भारतीयांप्रति आदर वाढला, असे ब्रह्मेशानंद स्वामींनी नमूद केल्याचे भाजप पदाधिका-यांनी लोकमतला सांगितले.
दरम्यान, संपर्कसे समर्थन ह्या कार्यक्रमाचा भाग याच नात्याने गोवा भाजपाचे नेते आर्चबिशप फेर्राव यांना भेटणार आहेत. त्यांच्याकडून भेटीची वेळ कधी दिली जाते याकडे भाजपचे लक्ष आहे. आर्चबिशपांनाही मोदी सरकारच्या कामाची माहिती दिली जाणार आहे, असे पक्ष सुत्रंनी सांगितले. आर्चबिशपांची काही विधाने ही राष्ट्रीय स्तरावर व गोव्यातही सध्या चर्चेची ठरली आहेत. मात्र त्या विधानांविषयी चर्चा करणो हा भाजपच्या आर्चबिशप भेटीचा हेतू नसेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.