पणजीच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर, उपमहापौरपदी अस्मिता केरकर बिनविरोध, उद्या अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 08:45 PM2018-03-13T20:45:12+5:302018-03-13T20:45:12+5:30

गोव्यातील एकमेव असलेल्या पणजी महापालिकेच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदी अस्मिता केरकर ही दोघेही बिनविरोध निवडून आली असून सत्ता पुन: बाबुश मोन्सेरात गटाकडे गेली आहे.

Vitthal Chopdekar Panaji's New Mayor | पणजीच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर, उपमहापौरपदी अस्मिता केरकर बिनविरोध, उद्या अधिकृत घोषणा

पणजीच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर, उपमहापौरपदी अस्मिता केरकर बिनविरोध, उद्या अधिकृत घोषणा

googlenewsNext

पणजी -  गोव्यातील एकमेव असलेल्या पणजी महापालिकेच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदी अस्मिता केरकर ही दोघेही बिनविरोध निवडून आली असून सत्ता पुन: बाबुश मोन्सेरात गटाकडे गेली आहे. भाजपने उमेदवार रिंगणात उतरविले नाहीत. 
मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती परंतु भाजप गटातून एकही अर्ज आला नाही. निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहणारे आयुक्त अजित रॉय यांनी या प्रतिनिधीला सांगितले की, उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता निकालाची अधिकृत घोषणा केली जाईल.  

३0 सदस्यीय महापालिकेत भाजपकडे १३ आणि बाबुश गटाकडे १५ असे संख्याबळ आहे. महापौर फुर्तादो यांच्याकडे ते स्वत: आणि नगरसेविका असलेली पत्नी रुथ फुर्तादो अशी दोन निर्णायक मतें आहेत. फुर्तादो दांपत्याने भाजपला समर्थन दिल्यास १५-१५ असे समान संख्याबळ होऊन वेगळीच कलाटणी मिळू शकली असती परंतु भाजपने उमेदवार रिंगणात न उतरविल्याने या सर्व गोष्टींवर पाणी फिरले. 

 बाबुशचे पाच नगरसेवक अनुपस्थित 

विठ्ठल चोपडेकर आणि अस्मिता केरकर यांनी दुपारी १२.३0 वाजता निर्वाचन अधिकारी या नात्याने आयुक्तांकडे उमेदवारी अर्ज सादर केले. त्यावेळी बाबुश गटातील १५ पैकी १0 नगरसेवकच उपस्थित होते. उदय मडकईकर, राहुल लोटलीकर, मार्गारिदा कुएलो फर्नांडिस, कांता शिरोडकर व नाझारेथ काब्राल हे पाच  नगरसेवक फिरकले नाहीत. मडकईकर हे खरे तर सुरवातीपासून महापौरपदासाठी इच्छुक उमेदवार होते. लोटलीकर हेही या पदासाठी शर्यतीत होते. परंतु बाबुश यांनी विठ्ठल चोपडेकर यांची निवड केली. 

संख्याबळ नव्हते म्हणून उमेदवार दिले नाहीत : कुंकळ्येंकर 

महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे मार्गदर्शक तथा माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘आमच्याकडे संख्याबळ नव्हते त्यामुळे उमेदवार रिंगणात उतरवून फायदा नव्हता.’  दरम्यान, भाजपमध्ये गटबाजी झाल्याने उमेदवार दिले नाहीत, अशी चर्चा शहरात होती परंतु कुंकळ्येंकर यांनी ती फेटाळून लावली. भाजपचे तेराही नगरसेवक एकसंध असून कुठलीही गटबाजी नसल्याचा दावा त्यांनी केला.  चोपडेकर आणि केरकर दोघेही गेल्या महापालिका निवडणुकीत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहेत. 

Web Title: Vitthal Chopdekar Panaji's New Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.