सासष्टीत मतदार गोंधळले, आमदारही संभ्रमात; दक्षिण गोव्यात भाजपसह काँग्रेसचाही उमेदवार ठरेना 

By सूरज.नाईकपवार | Published: March 7, 2024 01:51 PM2024-03-07T13:51:27+5:302024-03-07T13:52:27+5:30

अनेकांची द्विधा मनस्थिती

voters are confused mla are also confused in south goa neither the bjp nor the congress got a candidate | सासष्टीत मतदार गोंधळले, आमदारही संभ्रमात; दक्षिण गोव्यात भाजपसह काँग्रेसचाही उमेदवार ठरेना 

सासष्टीत मतदार गोंधळले, आमदारही संभ्रमात; दक्षिण गोव्यात भाजपसह काँग्रेसचाही उमेदवार ठरेना 

सूरज पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी आतापर्यंत आपला उमेदवार घोषित केला नसल्याने सासष्टीतील सर्वधर्मीय मतदारही गोंधळलेले आहेत. या पक्षांचा उमेदवार कोण असेल? हेही मतदारांना अजून कळू शकले नाही. त्यामुळे आपल्या वाट्याला यापुढे कोणता उमेदवार येईल किंवा कोणता उमेदवार आपल्यावर लादला जाईल, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. अचानक महिला उमेदवार आणला जाणार असल्याने भाजपचे आमदारही संभ्रमात पडले आहेत.

भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ यावेळी अत्यंत प्रतिष्ठेचा केला आहे. कुठल्याही स्थितीत हा मतदारसंघ काबीज करायला हवा, असे पक्षश्रेष्ठींनी गोवा भाजपला सांगितलेले आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व दामू नाईक या तिघांची नावेही पक्षश्रेष्ठींपुढे गेली होती. या तिघांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी आपले मॅनेजमेंटही केले होते. मात्र, ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी दक्षिण गोव्यात महिला उमेदवाराचा निर्णय घेतला व या त्रिकुटाच्या एकंदर प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.

महिला उमेदवारांची नावेही पुढे येत आहेत, मात्र यातील अनेकांना मतदारसंघातील सामान्य मतदार ओळखतही नाही. ऐनवेळी महिला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने इच्छुक उमेदवार, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. वरकरणी ते तसे भासवत नाहीत हा भाग वेगळा, पक्षश्रेष्ठींपुढे काही बोलता येत नाही, अशी स्थिती या नेत्यांची, तसेच आमदार व कार्यकर्त्यांचीही झाली आहे.

इंडिया आघाडीतर्फे काँग्रेस गोव्यात लोकसभा निवडणूक लढवणार आहे. आपतर्फे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांना आपने उमेदवार म्हणून जाहीर केले होते. नंतर या नाट्यावर पडदा पडला. आरजीने रुबर्ट पेरेरा यांना उमेदवारी जाहीरही केली आहे. गोंधळलेले मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतील, हे काही सांगता येत नाही.

कामत यांना तिकीट दिले असते तर...

दिगंबर कामत यांनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट करत विषय संपवला. कामत यांनी उमेदवारीवर दावा केला असता व त्यांना उमेदवारी मिळाली असती तर काही प्रमाणात का होईना सासष्टीतील अल्पसंख्याक मते आपल्याकडे वळवू शकले असते.

काँग्रेस व भाजप हे दोन्हीही पक्ष दक्षिण गोव्यात कोण पहिल्यांदा उमेदवाराचे नाव घोषित करणार याचीच वाट बघत आहेत. जर काँग्रेसने या उमेदवार दिला, तर सासष्टीतील खेपेला हिंदू बहुतांश ख्रिस्ती मतदारांची मते काँग्रेसपासून फारकत घेऊ शकतात. काही प्रमाणात ही मते आरजीकडेही वळू शकतात. तर अनेक जण नोटाचा पर्याय स्वीकारु शकतात. - अॅड. क्लियोफात कुतिन्हो.

दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी महिला उमेदवार ठेवणे ही भाजपची एक रणनीती आहे. महिलांना राजकीय आरक्षण जाहीर झाले नसतानाही आम्ही महिला उमेदवार दिला व तेही गोव्यातून, अशी देवडी त्यातून पिटताही येईल. दुसरीकडे काँग्रेस अल्पसंख्याक उमेदवार देणार नसेल तर त्यांना त्या समाजातील शिक्षित वर्गाकडे चर्चा करावी लागेल. - प्रभाकर तिंबले, राजकीय विश्लेषक

उमेदवार जाहीर न करणे ही मतदारांमध्ये गोंधळ तयार करणारी गोष्ट आहे. ख्रिस्ती समाज हा नेहमीच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर उभा राहिलेला आहे. काँग्रेसने उत्तर गोव्यात हिंदू उमेदवार उभा केल्यास दक्षिण गोव्यात ख्रिस्ती उमेदवार उभा करणे म्हणजे, याही समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या मताशी मी सहमत आहे. - एल्वीस गोम्स, काँग्रेस नेते

 

Web Title: voters are confused mla are also confused in south goa neither the bjp nor the congress got a candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.