मतदान ४ फेब्रुवारीला
By admin | Published: January 5, 2017 02:02 AM2017-01-05T02:02:20+5:302017-01-05T02:02:39+5:30
पणजी : गोवा विधानसभेची निवडणूक येत्या ४ फेब्रुवारी रोजी घेतली जाईल व त्यासाठी येत्या दि. ११ पासून उमेदवारी अर्ज
पणजी : गोवा विधानसभेची निवडणूक येत्या ४ फेब्रुवारी रोजी घेतली जाईल व त्यासाठी येत्या दि. ११ पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली
असून राज्यभरातील मद्यालयांवर तसेच घरगुती वापराच्या वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी अबकारी खाते तसेच पोलीस व वाणिज्य कर खात्याला केली आहे.
निवडणुकीसंबंधीची अधिसूचना येत्या ११ जानेवारी रोजी जारी केली जाईल. त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आरंभ होईल. आम्ही निवडणुकीसाठी सर्व तयारी केली असून अत्यंत चांगल्या व मुक्त वातावरणात निवडणुका पार पडाव्यात म्हणून आम्ही पावले उचलत आहोत, असे कुणाल यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून निवडणूक यंत्रणा बरीच काळजी घेत आहे. मद्यालयांमधून मद्याची विक्री अचानक वाढलेली आहे काय, हे पाहण्याचे काम अबकारी खाते करणार आहे. टीव्ही, फ्रिज, मायक्रोव्हेवओव्हन अशा वस्तूंसाठी अचानक एखाद्या विक्रेत्याकडे मागणी वाढलेली आहे काय, हे वाणिज्य कर खात्याकडून पाहिले जाईल. पोलिसांनाही सतर्क केले आहे. (खास प्रतिनिधी)