विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी मतदान: मुख्यमंत्री सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 09:58 AM2024-05-08T09:58:42+5:302024-05-08T09:59:04+5:30
डिचोली तालुक्यात उत्साही वातावरणात मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोली तालुक्यातील मये, डिचोली आणि साखळी या तीनही मतदारसंघांत सकाळपासून उत्साही वातावरणात मतदान झाले. पर्यावरणपूरक व विविधतेने नटलेल्या मतदान केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेत होते.
पहिल्या टप्प्यात १७ ते १३ टक्के मतदान, दुपारी १ वा. पर्यंत ६१ मतदान, दुपारी ३ वा. पर्यंत साखळीत ७२ टक्के तर, मये, डिचोलीत ६५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी तसेच स्वयंपूर्ण गोवा आत्मनिर्भर गोवा अंतर्गत आगामी पाच वर्षांत नव्या उमेदीने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डबल इंजिन विकासासाठी सज्ज होणार आहे.
त्यासाठीच मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने राज्यातील दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. कोठंबी पाळी येथील बुथ क्रमांक ४७ या ठिकाणी मुख्यमंत्री सावंत व सुलक्षणा सावंत यांच्यासह त्यांचे वडील पांडुरंग सावंत आदींनी मतदान केले.
निवडणूक आयोगाने विविध ठिकाणी पर्यावरणपूरक व नावीन्यपूर्ण अशी मतदान केंद्रे उभारताना एकप्रकारे मतदारांना उत्साह यावा, अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे निश्चितच चांगल्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रतापसिंह राणे यांनी केले कारापूर येथे मतदान
आज सकाळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मेणकुरे येथे मतदान केले. कुंभारवाडा येथील बुथवर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मतदान केले. कारापूर येथील मतदान केंद्रावर माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे तसेच विद्यमान आरोग्य मंत्री विश्वजित राणे, पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी मतदान केले.
नवमतदारांत उत्साह
नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करताना नवभारत निर्मितीचा ध्यास घेऊन पंतप्रधान मोदी हे अखंडित सेवा करीत आहेत. युवाशक्तीच्या मागे पंतप्रधान भक्कमपणे उभे आहेत. तसेच मुख्यमंत्री डॉ. सायंत यांनीही युवकांसाठी स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर योजनांचा चालना दिल्याने त्यांच्याही स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी युवाशक्ती निश्चितपणे कार्यरत राहील, अशा प्रतिक्रिया नवमतदारांनी व्यक्त केल्या.
दिव्यांगांसाठी विशेष सुविधा
महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य जनतेने मतदान प्रक्रियेत आपली भूमिका बजावली. मतदान केंद्रावर विकलांग, ज्येष्ठ व इतर मतदारांसाठी सर्वप्रकारची सुविधा उपलब्ध केली होती. उपनिवडणूक अधिकारी रमेश गावकर, विमोद दलाल, सचिन देसाई या अधिकाऱ्यांनी तसेच पोलिस वाहतूक व इतर अधिकाऱ्यांनी उत्तम व्यवस्था केली होती. त्यामुळे एकूणच निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात झाली.