विष्णू वाघ यांची प्रकृती गंभीर, पत्नीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 12:42 PM2018-08-08T12:42:24+5:302018-08-08T12:55:41+5:30
गोवा व महाराष्ट्रातही ज्यांचे नाव आहे असे बहुचर्चित मराठी लेखक आणि गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती गंभीर आहे.
पणजी : गोवा व महाराष्ट्रातही ज्यांचे नाव आहे असे बहुचर्चित मराठी लेखक आणि गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयातील उपचारानंतरही वाघ यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झालेली नाही. तथापि, सरकारने यापूर्वी वैद्यकीय बिले न फेडल्याने वाघ यांची पत्नी अरूणा वाघ यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहिले असून वाघ यांच्या बिलांना मंजूरी दिली जावी अशी विनंती केली आहे.
वाघ हे गेले काही दिवस रुग्णालयात आहेत. त्यांना थंडी झाली असे निमित्त झाले व इनफेक्शनची बाधा झाली. मुंबईत गेल्या वर्षी काही महिने उपचार घेऊन वाघ परतले होते. त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र ते उठून चालत नव्हते. त्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. आता त्यांची प्रकृती गंभीर आहे, असे सुत्रांनी सांगितले. भाजपचे पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी रुग्णालयात जाऊन वाघ यांच्या पत्नीची भेट घेतली.
वाघ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ते लेखक, मराठी व कोंकणी कवी, एकेकाळचे पत्रकार, अत्यंत प्रभावी वक्ते, माजी आमदार, कला अकादमीचे माजी चेअरमन अशी त्यांची ओळख आहे. मुंबई व महाराष्ट्रातही त्यांच्या कवितांचे चाहते आहेत. वाघ यांना दीड दोन-वर्षापूर्वी हृदयविकाराचा झटका आला व ते रुग्णालयात पोहचले. त्यांची स्थिती त्यावेळीही गंभीर होती. त्यांच्यावर मुंबईतील मोठ्या रुग्णालयामध्ये उपचार केले गेले. त्यांची प्रकृती थोडी सुधारल्यानंतर त्यांना गोव्यात आणले गेले होते. ते निवासस्थानीच असायचे. त्यांची पत्नी अरुणा वाघ त्यांची सेवा करतात.
अरूणा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून आपली स्थिती मांडली आहे. आपण स्वत: आजाराशी सामना करत आहे. आपले पती विष्णू वाघ यांच्या वैद्यकीय उपचारांवर जो खर्च येतो, त्याची भरपाई पूर्वी सरकार देत होते पण ऑगस्ट 2017 पासून सरकारने बिलेच फेडली नाहीत. यामुळे आर्थिकदृष्ट्या आपण अडचणीत आलो आहोत. आपल्याला दोन मुले आहेत. त्यांचे शिक्षण, घर संसार व पती वाघ यांचे आजारपण या सगळ्या आघाड्यांवर जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्यावर आर्थिक बोजा येतो. त्यामुळे सरकारने वैद्यकीय बिले तातडीने फेडावीत असे वाघ यांच्या पत्नीने म्हटले आहे. गोव्यात आजी-माजी आमदारांच्या वैद्यकीय खर्चाची बिले सरकारने फेडण्याची कायद्यात तरतुद आहे.