सर्व भेद मिटले, तर भारत विश्वगुरू बनेल: वामन केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:18 PM2023-02-09T13:18:23+5:302023-02-09T13:19:10+5:30
सर्व अन्याय संपला पाहिजे, जाती कशाला पाहिजेत?
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सर्व अन्याय संपला पाहिजे, - जाती कशाला पाहिजेत? भारत जर विश्वगुरू व्हायचा असेल, तर सगळे भेद मिटले पाहिजेत. सगळे मिळून - एका पातळीवर जोपर्यंत समाज येत नाही, तोपर्यंत हे घडणार नाही, असे मत प्रख्यात नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.
मडगावातील गोमंत विद्या निकेतनच्या विचारवेध व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. आपण अमेरिकन लोकांकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एकेकाळी गोरे आणि काळे या दोन वर्णांचा संघर्ष तिथे चालू होता आणि काळ्यांना गुलाम म्हणून वागवले जायचे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संस्कृतीची श्रीमंती
माझ्या नाटकात शेतकरी किंवा शेतीशी संबंधित सगळे विषय येतात. पहाटे चार वाजता येणारे कुरमुरे, सहा वाजता येणारा वासुदेव, त्याच्या पुढे येणारा गोंधळ इथपासून रात्रीचे कीर्तन, भारुडापर्यंत आणि चावडीच्या मागच्या बाजूला चालणारा तमाशा इथपर्यंतचे सगळे हे शेतीप्रधान जीवनातून उभे राहिलेले आहे. या सगळ्या गोष्टींचा लहानपणापासून म्हणजे नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत अक्षरश: माझ्यावर वर्षाव झालाय आणि त्या मला फुकट मिळाल्या. त्याच्यासाठी मी काही फारशी मेहनत केलेली नाही. माझ्या सुदैवाने मला लोककलेचे संस्कार फुकटामध्ये मिळाले, ही श्रीमंती मला मिळाली, असे केंद्रे पुढे म्हणाले.
चळवळ, आंदोलनांनी केले माझ्यावर संस्कार
त्या काळात राजकीय चळवळी व आंदोलने चालू होती. त्यांचा फार मोठा संस्कार किंवा परिणाम हा माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या विचार प्रक्रियेवर आहे, असे त्यांनी सांगितले. त्या काळामध्ये विद्याथ्र्यांच्या समस्येवर आंदोलने चालू होती. आठवीपासून त्यांच्याशी संबंध आला. पुढे शेतकयांच्या समस्यांवर मराठवाडा विकास आंदोलन झाले. त्याच्यामध्ये मी होतो. नंतर एक फार मोठे आंदोलन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले गेले पाहिजे म्हणून झाले. विद्यापीठाच्या नामकरणानंतर ती आंदोलने शमली, असे केंद्रे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"