दिल्लीतील वॉण्टेड गुन्हेगारांना कळंगुट येथे अटक
By काशिराम म्हांबरे | Published: October 6, 2023 08:35 PM2023-10-06T20:35:32+5:302023-10-06T20:36:34+5:30
ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.
काशीराम म्हांबरे, म्हापसा: दिल्ली पोलिसांच्या वॉण्टेड यादीत असलेल्या तसेच अपराधी म्हणून घोशीत केलेल्या जोडप्या विदेशी नागरिकांना कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.
अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकात यात आजिझातानी कुल्येवा ( तुर्कमेनिस्तान ) तसेच तिचा पती शेरगेट अफगाण (अफगाणीस्तान) यांचा समावेश आहे. शुक्रवार ६ आॅक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांचे पथक या गुन्हेगारांच्या शोधात कळंगुट येथे आले होते. ते दोघेही कळंगुट परिसरात असल्याची चाहूल त्यांना लागली होती.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य दिल्लीत खुनाचा प्रयत्न, फसवणुक, अपहरण, अनैतिक तस्करी सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात गुंतले होते. विविध न्यायालयात त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्याला ते उपस्थित रहात नसल्याने त्यांना न्यायालयाकडून फरारही घोषीत करण्यात आले होते.
कळंगुटचे निरीक्षक मिलिंद भुईंबर, उपअधिक्षक विश्वेश कर्पे, अधिक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना ताब्यात घेण्यास उपनिरीक्षक अनिल पोलेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली. हे जोडपे कांदोळी येथील बामणवाडा परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली. शेवटी त्यांना सापळा रचून तेथूनच अटक करण्यात आली. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन हस्तांतरण रिमांडखाली दोघांनाही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.