पाणी, वीज जाय जाय..
By admin | Published: April 21, 2015 01:37 AM2015-04-21T01:37:03+5:302015-04-21T01:37:15+5:30
पेडणे : पाणी आणि वीज दरवाढीसंदर्भातील सरकारी परिपत्रकाची होळी करून मांद्रे गट काँग्रेस समितीने सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या मांद्रे
पेडणे : पाणी आणि वीज दरवाढीसंदर्भातील सरकारी परिपत्रकाची होळी करून मांद्रे गट काँग्रेस समितीने सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या मांद्रे मतदारसंघातून त्या निषेध मोहिमेचा प्रारंभ केला.
चोपडे मासळी मार्केटजवळ हा निषेध मोर्चा झाला. चोपडे तिठ्यावर सरकारच्या विरोधात घोषणा देत चोपडे मासळी मार्केटजवळ एकत्र झाल्यानंतर सभेत रूपांतर झाले. या वेळी मोर्चेकऱ्यांना ‘भाजप सरकार हाय हाय पाणी-वीज आमका जाय जाय, अच्छे दिन आ गए गरिबोंको खा गए’, भाजपा सरकार भिकारी - हाती द्या सुपारी’ अशा घोषणा दिल्या.
या वेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबी बागकर म्हणाले, सामान्यांच्या खिशात हात घालून विद्यमान सरकार उधळपट्टी करीत आहे. मांडवीवर तिसरा पूल उभारण्यासाठी एक हजार कोटी सरकारकडे आहेत. मात्र, सामान्यांच्या पाणी, वीज सारख्या गरजा पुऱ्या करणे शक्य होत नाही. याचा अर्थ विद्यमान सरकार उच्चभ्रू लोकांचे हित जपणाऱ्यांचे आहे. सर्वसामान्य जनतेला कर्जबाजारी करणाऱ्या या सरकारला शापोरा नदीत बुडवा.
म्हापसा गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय भिके म्हणाले, राज्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असून पाणी आणि विजेसाठी सामान्य जनतेच्या खिशाला चिमटा काढणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. रोटी, कपडा और मकान यापेक्षा पाणी ही प्रत्येकाची गरज आहे, ती पूर्ण व्हायला हवीच.
मांद्रे गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुधीर कान्नाईक यांनी सरकारच्या वीज दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला. खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या भाजपाने आम आदमीचे जीणे मुश्कील केले आहे. जीव वाचवण्यासाठी हेल्मेटची सक्ती करणारे सरकार औषधावर १४ टक्के व्हॅट लावून दरवाढ करते, यावरून दुटप्पी धोरण लक्षात येते, असे ते म्हणाले.
मांद्रे गट समितीचे उपाध्यक्ष नारायण रेडकर म्हणाले, सरकार योजनांच्या नावाखाली एक बाजूने देते अणि टॅक्स तसेच दरवाढीच्या रूपात जनतेला लुटते. या ‘स्लो पॉयझन’पासून जनतेने सावध होण्याची गरज आहे.
काँग्रेस मांद्रे सेवा दल अध्यक्ष संजय कोले म्हणाले, दरवाढीच्या आगीत सामान्य जनता होरपळत आहे, त्यासाठी जनतेने वेळीच सावध व्हावे.
गोविंद केरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)