घरांत शिरले पाणी; टोंक परिसराची महापौरांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 09:09 AM2023-07-07T09:09:56+5:302023-07-07T09:11:11+5:30
बांधकामामुळे येथील गटारे तुंबून साचलेले पाणी घरांमध्ये शिरले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः टॉक येथील रियल सोडा कारखान्याच्या मागील भागात पहिल्यांदाच घरांमध्ये पाणी घुसले आहे. या परिसरात नवीन इमारत येत असल्याने याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे येथील गटारे तुंबून साचलेले पाणी घरांमध्ये शिरले.
दहा दिवसांपासून घरांच्या चारही बाजूने गुडघाभर दूषित पाणी भरले असून, येथे ये-जा करणेदेखील कठीण झाले आहे. स्थानिकांकडून पालिकेकडे याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील कुठलीही उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. पंपच्या सहाय्याने पाणी काढण्याचा प्रयत्न देखील मनपाने येथे केला नसल्याचे दिसून येते. महापौर, उपमहापौर यांनी या गुरुवारी या भागाची पाहणी केली. शुक्रवारी हे पाणी काढू व उपाययोजना करू, असे आश्वासन महापौरांनी दिले.
डासांचा उपद्रव
टॉक येथील वा भागात गटारांमधील दूषित पाणी साचून राहिल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली आहे. त्यामुळे या परिसरात साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने दखल घेऊन कीटकनाशक फवारणी केली आहे.
नव्या इमारतीच्या बांधकामामुळेच यंदा हे पाणी घरात शिरले आहे. यापूर्वी काही प्रमाणात पाणी साचायचे व काही तासानंतर हे पाणी कमी व्हायचे. परंतु आता बांधकाम पाणी जाण्याच्या वाट नसल्यामुळे पाणी साचून घरात शिरले आहे. - दामोदर साळगावकर, स्थानिक