गोव्यात पावसाने झोडपले; नदी धरणांच्या पाण्याची पातळी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 03:24 PM2024-07-05T15:24:21+5:302024-07-05T15:26:36+5:30
पुढील पाच दिवस राज्यात जाेरदार पावसाची शक्यता
नारायण गावस
पणजी: राज्यात पावसाचा जाेर वाढला असून सर्वत्र पावसाने झाेडपून काढले आहे. राज्यात नद्या, बंधारे तसेच धरणांची पाण्याची पातळी वाढली आहे. राज्यभरात ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस राज्यात जाेरदार पावसाची शक्यता वर्तवली असून राज्य हवामान खात्याने येलो अलर्टही जारी केला आहे.
नदी धरणाच्या पाण्याची पातळी वाढली
गेले आठ दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढू लागली आहे. सत्तरीत सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने म्हादई नदीची पातळी वाढली आहे. त्याच प्रमाणे अंजूणे धरणाची पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच चाेर्ला घाटात दरडी पडण्याच्या घटना घडत आहे. अंजूणे धरणाप्रमाणे साळावली, आमथाने, पंचवाडी तसेच इतर धरणांची पाणतळीही वाढत आहे. राज्यातील नद्या उपनद्यांना पुर यायला सुरुवात झाली आहे. बहुतांश भागात शेती बागायती पाण्याखाली गेल्या आहेत. .याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
ठिकठिकाणी पडझड
गेले आठ दिवस राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचप्रमाणे चाेर्ला घाटात तसेच इतर ठिकाणी दरडी काेसळण्याच्या घटना घडल्या आहेत. जाेरदार पावसाने लाेकांच्या घरावर झाडे पडून नुकसान हाेण्याच्या घटना राज्यभरातून समाेर येत आहेत. अग्निशमन दलाला विविध ठिकाणाहून अशा घटनांचे कॉल येत असून त्यांच्याकडून ते दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे.
राज्यात आतापर्यंत ४५ इंच पावसाची नोंद
राज्यात १ जून ते ५ जुलैपर्यंत ४५ इंच पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक पाऊस वाळपई केंद्रावर नोंद झाला आहे. वाळपईत ५५ इंचा पेक्षा जस्त पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासातही वाळपईत ५.२९ इंच तर सांगेत ४.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल म्हापसा ४.२९ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आज शुक्रवार ऑरेंज अलर्ट असून पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.