धबधबे पर्यटकांना खुणावताहेत; सत्तरीत नैसर्गिक पर्यटनाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 10:24 AM2023-07-02T10:24:35+5:302023-07-02T10:26:13+5:30
सुटीच्या दिवशी गर्दी.
दशरथ मांद्रेकर, लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई : सत्तरीत सध्या पावसाळी पर्यटनाला उधाण आले असून अनेक भागांत धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे गोव्याबरोबर इतर राज्यांतील पर्यटकांना पर्यटनाची ओढ लागली आहे. गेले दोन दिवस पावसाने जोर धरला असल्याने सत्तरीत येत्या शनिवार, रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसणार आहे. त्यात तरुण तरुणींबरोबर पन्नाशी ओलांडलेलेसुद्धा आपल्याला रोखू शकत नाही, असे पर्यटकांना वाटते.
सत्तरीत पावसाळी पर्यटनात ग्रामीण भागात अनेक धबधबे वाहतात. सत्तरीत चरावणे, हिवरे, नानेली, सालेली, मोर्ले, शेळप, चोर्ला घाट, पाली, रिंवे कुमठळ ह्या गावात पावसाळ्यात धबधबे मोठ्या प्रमाणात वाहतात. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सत्तरीत यापूर्वी चरावणे, हिवरे व चोर्ला घाट ही तीनच ठिकाणी मोठी गर्दी व्हायची. पण, आता गेल्या दोन वर्षांत अनेक ठिकाणी धबधब्यांचा शोध लागल्याने पर्यटक सर्वच ठिकाणी गर्दी करत आहेत.
वनविभागाकडून प्रवेश कर
सत्तरीतील अनेक धबधबे म्हादई अभयारण्यात येत असून त्यामुळे वन अधिकारी धबधब्यावर प्रवेश देण्यासाठी टोल घेत आहे. तसेच पोलिस अनेकांवर कारवाई करीत आहेत. शनिवार, रविवार पोलिस, वन व अबकारी अधिकारी संयुक्तरित्या कारवाई करताना दिसतील. पण त्या कारवाईचा कोणताही फरक पर्यटकांवर मात्र पडत नाही. अनेक तरुण, तरुणींना धबधब्याचे आकर्षण ठरणार आहे.
गावात दारू पिऊन दंगा
पावसाळी पर्यटनाचा फायदा फक्त बारमालकांना सोडल्यास इतर कोणालाही फायदा होत नाही. गावातील लोकांना फक्त धिंगाणाच पाहायला मिळतो. त्यामुळे रोजगार निर्मिती वगैर काहीच होत नाही. पर्यटक येताना खाद्यपदार्थ घेऊन येत असल्याने हॉटेलनांही फायदा होत नाही. केवळ बारवाल्यांना लाभदायी ठरतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायच्या दृष्टीने विचार केला तर त्याचा फायदा काहीही होत नाही.
पर्यटकांचा धिंगाणा
- चोर्ला घाटाबरोबर पर्यटक धिंगाणा घालताना दिसतात असून दारू पिऊन दंगामस्ती करत असल्याने शनिवार रविवार पोलिसांचा मोठा फौजफाटा दरवर्षी ठेवत आहेत. चोर्ला घाटात तर बिग- गोमंतकीय मोठ्या प्रमाणात दंगामस्ती करतात.
- सुर्ला गावातील दारूबंदी झाल्याने गेल्यावर्षी काही प्रमाणात बिगरगोमंतकीय पर्यटकांवर नियंत्रण आले होते. पण, बेळगाव, कर्नाट कातील पर्यटक चोर्ला घाटातून केरी गावात येत असून त्या ठिकाणाहून दारू घेऊन नंतर चोर्ला घाटात धिंगाणा घालत असतात
- कर्नाटकातील पर्यटक गोवा हद्दीपासून जवळच धिंगाणाघा लतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना अडचणी येतात. धबधब्यावर येणारे तोकडे कपडे घालून येतात. त्यामुळे महिलांना लजास्पद वाटत असते.