छत्रपती शिवाजी महाराजांना आक्रमणकर्ते संबोधल्यानं संतापाची लाट; गोवा पर्यटन खात्याच्या ट्वीटनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 02:14 PM2021-04-02T14:14:56+5:302021-04-02T14:17:12+5:30
वादग्रस्त ट्विट खात्याने घेतले मागे, काँग्रेसकडून भाजपावर जोरदार टीका
पणजी : आग्वाद किल्ल्यासंबंधी गोवापर्यटन खात्याने ट्वीटमध्ये शूर व पराक्रमी मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे वादग्रस्त ट्विट खात्याने त्वरित मागे घेऊन सारवासारव केली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करताना भाजपच्या मॉडीफाइड इतिहासाच्या धोरणामुळे पराक्रमी मराठा साम्राज्याचा घोर अपमान झालेला असल्याचं म्हटलं आहे. सरकारने जनतेची व स्वाभिमानी देशभक्तांची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे गोमंतभूमिसाठी खुप मोठे योगदान असून, स्वाभिमानी गोवेकर ते कदापी विसरु शकत नाही. भाजप सरकारने मराठा साम्राज्याचा अपमान करणे हे दुर्देवी आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. सन २०१२ मध्ये गोव्यात व सन २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने भारत देशाचा गौरवशाली इतिहास बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप सरकार केवळ जुमला राजकारणाचा उदो उदो करण्यात व्यस्त आहे. भाजपाने आता तरी कार्यकर्त्यांना देशाचा खऱ्या इतिहासाचे धडे द्यावेत, असे कामत यांनी म्हटले आहे.
पर्यटन खात्याने आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी व जबाबदारीने वागण्यास शिकवावे. गोमंतकाच्या वैभवशाली इतिहासाचा विपर्यास करण्याऐवजी येथील पर्यटन स्थळे स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यावर भर द्यावा, अशी मागणीही कामत यांनी केली आहे. छत्रपतींच्या मराठा साम्राज्याच्या करण्यात आलेल्या अपमानाला जबाबदार कोण, याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कामत यांनी केली आहे.
छत्रपतींबद्दल हा द्वेष का?; गोवा फॉरवर्डचा सवाल
गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी या ट्वीटबद्दल तीव्र संताप व्यक्त करताना सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेष का असा प्रश्न केला आहे. ते म्हणाले की, बोडगेश्वर देवस्थान समितीवर या सरकारने गुन्हे दाखल केले. त्यानंतर शिवजयंती दिवशी मिरवणुकीला परवानगी नाकारली आणि आता हे वादग्रस्त ट्विट समोर आले आहे. एवढा द्वेष का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवे.
कडक समज देणार : पर्यटनमंत्री
दरम्यान, संतापाची लाट पसरल्यानंतर पर्यटन खात्याने त्वरित ट्वीट मागे घेऊन शुद्धिपत्रक टाकले आहे. चुकीची दुरुस्ती केलेली आहे तसेच ज्याने कोणी हा प्रकार केला त्याने माफी मागून खंतही व्यक्त केली आहे परंतु असे प्रकार पुढे घडू नयेत यासाठी मी कडक शब्दात अधिकाऱ्यांना समज देणार आहे, असे पर्यटनमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले.
In our post about Aguada fort, the word “invader” was meant to be used for the Dutch. It was intended to be read ”stronghold against Dutch invaders and Maratha rulers” instead of the erroneous reference.
— Goa Tourism (@TourismGoa) April 1, 2021
We regret the error and apologise. pic.twitter.com/qMttHFeGmm
काय होतं ट्विटमध्ये?
वादग्रस्त ट्विटमध्ये आग्वाद किल्ल्याच्या बाबतीत डच व मराठ्यांना आक्रमणकर्ते असे संबोधण्यात आले होते. हा किल्ला १६१२ साली बांधण्यात आला व किल्ल्याच्या काही भागाचा वापर नंतर मध्यवर्ती कारागृह म्हणून सुरू करण्यात आला.
कशी केली सारवासारव?
वादग्रस्त ट्विट मागे घेताना पर्यटन खात्याने आम्हाला डच यांना आक्रमणकर्ते म्हणायचे होते. मराठ्यांना नव्हे, अशी सारवासारव केली असून त्याबद्दल माफीही मागितली आहे. दरम्यान, शूर मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधणे निषेधार्ह असल्याचे पर्यटनमंत्रीही म्हणाले.