नाताळनिमित्त गोव्यातील हॉटेल बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 12:48 PM2017-11-29T12:48:50+5:302017-11-29T14:02:44+5:30
पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत.
म्हापसा - पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. डिसेंबराच्या १५ तारीखनंतरचे हॉटेल बुकिंग जवळ-जवळ फुल्ल झाले आहे. १५ डिसेंबरपर्यंत ७० टक्क्यांहून जास्त बुकिंग हॉटेलचे करण्यात आलेले आहेत. गोव्यातील पर्यटन हंगामातील डिसेंबर हा सर्वात महत्त्वाचा व व्यस्त महिना मानला जातो. त्यामुळे इतर महिन्यापेक्षा पर्यटकांची सर्वात जास्त वर्दळ या महिन्यातच असते. डिसेंबरात हॉटेलना पर्यटकांकडून होत असलेली प्रचंड मागणी लक्षात घेऊन हॉटेलचे भावही व्यवसायिकांकडून वाढवले जातात.
डिसेंबर महिना हा ख्रिस्ती बांधवांचा सण साजरा करण्याचा महिना मानला जातो. या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात साजरा होणारे जुने गोंयच्या सायबाच्या फेस्तापासून उत्सवमय वातारवणाची निर्मिती गोव्यात होत असते. त्यामुळे जुने गोव्याच्या फेस्तसाठी आलेले बरेच पर्यटक नवीन वर्षापर्यंत राहणे पसंद करतात. नवीन वर्ष संपले की पुन्हा माघारी निघून जातात.
नाताळ व नवीन वर्षाच्या तुलनेत उत्सवाच्या महिन्यात महिनाभर वास्तव्य करुन राहणारे पर्यटक बरेच कमी असतात. नाताळाच्या काळात २० डिसेंबर पासून ते नवीन वर्षापर्यंत दर वर्षी लाखोंनी देशी-विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात. शेवटच्या क्षणी त्रास होऊ नये यासाठी बरेच पर्यटक येण्यापूर्वी हॉटेलची आगाऊ नोंदणी करुन येणे पसंद करतात. ही नोंदणी किमान महिना दिड महिना अगोदर केलेली असते.
पर्यटकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी विविध योजना हॉटेल व्यवसायिकांकडून उत्सवाच्या काळात खास करुन नाताळांच्या दिवसात जाहीर केल्या जातात. त्यात नाताळ ते नवीन वर्षापर्यंत पर्यटकांना दिला जाणाऱ्या पॅकेजचा सुद्धा समावेश असतो. या पॅकेजात नाश्ता जेवणा सोबत संगीत रजनी तसेच इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा समावेश असतो. दिले जाणारे पॅकेज हॉटेलच्या तारांकनावर अवलंबून असते. काही हॉटेल व्यवसायिकांनी दिलेल्या माहिती नुसार कांदोळी, कळंगुट, बागा, हणजूण, वागातोर सारख्या भागातील हॉटेल फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत.
येणारे पर्यटक शहरी भागातील हॉटेलपेक्षा किनारी भागातील हॉटेलात वास्तव करणे जास्त पसंद करतात. त्यामुळे शहरातील हॉटेलपेक्षा किनाऱ्यातील हॉटेलांना डिसेंबरात जास्त मागणी असते. किनाºयातील हॉटेलना असणारी ही मागणी पाहता शहरी हॉटेलपेक्षा किनारी हॉटेलचे भाव जास्त असतात. या मागणीमुळे इथल्या हॉटेलचे भाव इतर दिवसांच्या तिलनेत किमान ५० टक्क्यापर्यंत वाढवले जातात. इतर दिवसात शहरी हॉटेल व किनारी हॉटेलांचे भाव समान असतात; पण डिसेंबरात किमान २० ते ३० टक्क्यांचा फरक यात असतो.
कळंगुट भागातील हॉटेल व्यवसायिक क्लावडियो पाशेको यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपासून राज्यातील पर्यटक व्यवसायाला गती येत असते. त्यामुळे पुढील काही दिवसात ही गती येऊ लागेल. गती आल्यानंतर हॉटेल नोंदणीत वाढ होत जाईल. होत असलेली नोंदणी सर्वात जास्त नाताळच्या दिवसातील असते.