गाव उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आम्हाला नकोत; बेताळभाटी ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 08:02 AM2024-10-14T08:02:51+5:302024-10-14T08:03:11+5:30
आता कोणतेही प्रकल्प इथे खपवून घेतले जणार नाहीत, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : बेताळबाटी पंचायत क्षेत्रात मेगा प्रकल्पांना नागरिकांकडून विरोध असल्याने ग्रामस्थांच्या मागणीवरून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याबाहेरील लोक गावात येऊन जमिनी खरेदी करतात व बांधकाम करून ते दुसऱ्यांना विकतात हे चुकीचे आहे. मात्र आता कोणतेही प्रकल्प इथे खपवून घेतले जणार नाहीत, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
राज्यातील जमिनीचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र सरकारच परवाने देत असल्याने जमिनींची विक्री वाढत आहे. त्यामुळे मेगा प्रकल्प वाढत असून स्थानिकांचे जगणे मुश्किल होत असून यापुढे गावात कोणत्याही प्रकल्पास थारा देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामसभेत दिला आहे.
यावेळी माजी मंत्री मिकी पाशेको म्हणाले, मेगा प्रकल्पाना स्थानिकांचा विरोध असताना पंचायतीकडून ना हरकत दाखल देण्यात येतो. पंचायतीकडून मेगा प्रकल्पाविरोधात तक्रार केल्यास त्याची दखल घेण्यात यावी. मेगा प्रकल्पांबाबतीत परवानगीसाठी आलेल्या सर्व फाईल्स ग्रामसभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात याव्यात, असे पाशेको यांनी सांगितले.
बेताळभाटी पंचायतीची ग्रामसभा वेळेवर घेतली जात नाही. तसेच ग्रामसभेचे इतिवृत्त वेळेवर पाठवले जात नाही. ग्रामविकास समिती, जैवविविधता समिती यांच्या बेठका झालेल्या नाहीत, अशा तक्रारी केल्या गेल्या, त्यावर गटविकास अधिकारी मिश्रा यांनी पंचायत सचिवांसोबत बैठक घेऊन मागील तीन ग्रामसभांचे इतिवृत्त तयार करण्यास सांगितले. त्याच बरोबर पुढील ग्रामसभेचे आताच नियोजन करण्यास सांगण्यात आले.
सरकारला पत्र पाठवा
सासष्टी गट विकास अधिकारी पल्लवी मिश्रा यांनी गावातील मेगा प्रकल्प पंचायतीला बंद करता येत नाहीत. त्यासाठी पंचायतीकडे अधिकार नसल्याचे सांगितले. त्यावेळी ग्रामस्थांकडून गावातील मेगा प्रकल्पांबाबत पंचायतीकडून राज्य सरकारला पत्र पाठवण्यात यावे. तसेच बेताळभाटीसाठी नवा प्रादेशिक आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी करत ठराव घेण्यात आला.