'कळसा - भांडुरा' निर्धारित मुदतीतच पूर्ण करू; कर्नाटक निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 12:40 PM2023-05-02T12:40:59+5:302023-05-02T12:43:06+5:30
म्हादईचे पाणी वळवले जाणार असल्याने गोव्यातील जनता कर्नाटकच्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी विरोध करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : म्हादई नदीवरील कळसा- भांडुरा प्रकल्प निर्धारित मुदतीतच पूर्ण केला जाईल, असे आश्वासन भाजपने कर्नाटकात निवडणूक जाहीरनाम्यात जनतेला दिले आहे.
म्हादईवर कळसा भांडुरासह भद्रा, अपर कृष्णा आदी पाटबंधारे प्रकल्पांसाठी व्यापक योजना आहे. हे सर्व प्रकल्प ठरवलेल्या मुदतीतच पूर्ण केले जातील, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कर्नाटकात येत्या १० रोजी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जाहीरनामा काढला आहे.
म्हादईचे पाणी वळवले जाणार असल्याने गोव्यातील जनता कर्नाटकच्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी विरोध करीत आहे. राज्य सरकारचीही कर्नाटककडे या प्रश्नावर न्यायालयीन लढाई आहे. असे असताना जाहीरनाम्यात वरील आश्वासन दिल्याने विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गोवा सरकारच्या शवपेटीवर आणखी एक खिळा: सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी यावर प्रतिक्रिया देताना गोव्यात सावंत सरकार व भाजपच्या शवपेटीवर हा आणखी एक खिळा असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकात भाजपने म्हादईवरील कळसा- भांडुरा प्रकल्प ठरवलेल्या वेळेतच पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने गोव्यातील भाजप नेते माता म्हादई विकण्यात सहभागी असल्याचे स्पष्ट होत आहे. ते म्हणतात की, गोव्यातील विश्वासघातकी भाजप नेते कर्नाटकात गावागावात निवडणूक प्रचारासाठी फिरत आहेत; परंतु, म्हादईबद्दल काही बोलू शकत नाहीत. गोव्याचे मुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या तालावर नाचत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"