दोन दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 11:51 AM2024-07-30T11:51:48+5:302024-07-30T11:52:52+5:30
आमदार नीलेश काब्राल यांनी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा शून्य तासात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत केली. तसेच यापूर्वी ज्यांची नुकसान भरपाई देणे बाकी आहे, त्यांनाही दोन दिवसांत भरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आमदार नीलेश काब्राल यांनी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा शून्य तासात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता. इतर आमदारांनीदेखील ही बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली. दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आंतोन वास यांनीही आपल्या मतदारसंघात अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. सभापती रमेश तवडकर यांनीही नुकसानीचे चित्र मांडले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे सांगितले. त्यावर युरी आलेमाव यांनी अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाची नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सांगताच मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत भरपाई देण्यात येईल, असे सांगितले.
'इंडिया आघाडी' दिशाभूल करतेय
विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना समजावून सांगावे त्यांना भडकवू नये. इंडिया आघाडी गोव्यात आणि देशभर शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांना समजावून सांगण्याऐवजी त्यांची दिशाभूल करण्याचे काम इंडिया आघाडीकडून सुरू असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावर विरोशी आमदारही खवळले.