दुर्गंधीयुक्त वास न थांबल्यास १५ दिवसात आंदोलन छेडू: आमदार संकल्प आमोणकर

By पंकज शेट्ये | Published: January 25, 2024 04:26 PM2024-01-25T16:26:07+5:302024-01-25T16:27:09+5:30

मुरगाव बंदरातून काही दिवसापासून रात्रीच्या वेळी दुर्गंधीयुक्त वास पसरण्यास सुरू झाल्याची तक्रार त्या भागात राहणाऱ्या लोकांकडून केली जात आहे.

we will launch agitation in 15 days if foul smell does not stop said goa mla sankalp amonkar | दुर्गंधीयुक्त वास न थांबल्यास १५ दिवसात आंदोलन छेडू: आमदार संकल्प आमोणकर

दुर्गंधीयुक्त वास न थांबल्यास १५ दिवसात आंदोलन छेडू: आमदार संकल्प आमोणकर

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: मुरगाव बंदरातून काही दिवसापासून येणाऱ्या दुर्गंधीयुक्त वासामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना बराच त्रास सोसावा लागतो. तो वास कशामुळे येतो ते शोधून काढून वास पसरू नये यासाठी १५ दिवसात योग्य उपाय योजना करा. तसे झाले नसल्यास १५ दिवसानंतर मुरगाव मतदारसंघातील नागरिकांबरोबर मिळून त्याच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी दिला.

मुरगाव बंदरातून काही दिवसापासून रात्रीच्या वेळी दुर्गंधीयुक्त वास पसरण्यास सुरू झाल्याची तक्रार त्या भागात राहणाऱ्या लोकांकडून केली जात आहे. आमदार संकल्प आमोणकर यांना त्याबाबत माहीती मिळताच त्यांनी त्वरित सडा भागातील लोकांची नव्याने सुरू झालेली ती समस्या दूर करण्यासाठी पावले उचलली. गुरूवारी (दि.२५) त्याच विषयावरून मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांच्या कार्यालयात संयुक्त बैठक बोलवली होती. त्यात मामलेदार, गोवा प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, पोलीस, आरोग्य खात्याचे अधिकारी, मुरगाव पोर्ट अथोरेटीचे अधिकारी, मुरगाव बंदरात कोळसा हाताळणाऱ्या जे एस डब्ल्यु आणि अदानी कंपनीचे अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

मुरगाव बंदरात कोळसा, बोक्साईट इत्यादी विविध माल हाताळण्यात येत असून रात्री तो वास कशामुळे येतो त्याबाबत आमोणकर यांनी प्रश्न उपस्थित केला. मुरगाव बंदरात हाताळण्यात येणाऱ्या कुठल्या मालामुळे अथवा कोळशावर मारण्यात येणाऱ्या पाण्यातून तो वास येतो ते शोधून काढण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलण्याचे आमोणकर यांनी सांगितले. तो वास कशामुळे येतो ते शोधण्यासाठी गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी केल्याची माहीती बैठकीत देऊन गुरूवारी संध्याकाळ पर्यंत त्याबाबत अहवाल येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. १५ दिवसाच्या आत सडा भागात रात्री पसरत असलेली दुर्गंधी थांबली नसल्यास मुरगाव मतदारसंघातील नागरिकांना घेऊन त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याची चेतावणी आमदार आमोणकर यांनी दिली. नव्याने निर्माण झालेली ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी उचित पावले उचलण्यात येईल असे आश्वासन यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार आमोणकर यांनी यापूर्वी अनेक वर्षापासून सडा येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पातील दुर्गंधीयुक्त वासाचा त्रास येथील नागरिक सोसत असल्याचे सांगितले. आता मुरगाव बंदरातून रात्री दुर्गंधीयुक्त वास पसरत असून त्याचा त्रास लोकांना होत आहे. १५ दिवसांच्या आत ही समस्या दूर झाली नसल्यास आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन छेडणार. त्यामुळे मुरगाव बंदरातील अधिकारी, कोळसा हाताळणाऱ्या कंपनीचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करून तो त्रास दूर करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलवावी असे आमोणकर म्हणाले.

Web Title: we will launch agitation in 15 days if foul smell does not stop said goa mla sankalp amonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा