मोर्चा काढू अन् पणजी ठप्प करू; नदी परिवहन खात्यावर धडक देणार: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:33 AM2023-11-06T09:33:38+5:302023-11-06T09:34:43+5:30

फेरीबोट भाडेवाढ तसेच दुचाकींना लागू केलेल्या तिकीट विषयावरून काँग्रेसने रविवारी जुने गोवे फेरीबोट धक्क्याजवळ निदर्शने केली.

we will march and stop panaji will attack river transport department congress protest against ferry boat fare increase | मोर्चा काढू अन् पणजी ठप्प करू; नदी परिवहन खात्यावर धडक देणार: काँग्रेस

मोर्चा काढू अन् पणजी ठप्प करू; नदी परिवहन खात्यावर धडक देणार: काँग्रेस

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : फेरीबोट भाडेवाढ करून भाजप सरकार हे जनतेला लुटत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सरकारने फेरीबोटी भाडेवाढीच्या निर्णय त्वरित रद्द करावा. अन्यथा नदी परिवहन खात्यावर धडक मोर्चा काढून पणजी ठप्प करू, असा इशारा काँग्रेसने काल दिला आहे.

फेरीबोट भाडेवाढ तसेच दुचाकींना लागू केलेल्या तिकीट विषयावरून काँग्रेसने रविवारी जुने गोवे फेरीबोट धक्क्याजवळ निदर्शने केली. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, हळदोणेचे आमदार अॅड. कार्लस फरेरा, कुंभारजुवे गटाचे विशाल कळंगुटकर, अमरनाथ पणजीकर आदी उपस्थित होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

आलेगाव म्हणाले, भाजप सरकार हे इव्हेंट मॅनेजमेंट सरकार बनले आहे. प्रत्येक गोष्टीत ते भ्रष्टाचार करीत आहे. राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाच्या केवळ बॅनरवर १८ कोटी रुपये खर्च केले. कोट्यवधी रुपये कार्यक्रमांच्या नावाखाली उधळले जात आहेत, तर आता फेरीबोटी तिकीट दरवाढ करून जनतेला लुटले जात आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे फटका बसणार असून, काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. भाडेवाढीची अधिसूचना सरकारने मागे घ्यावी, अन्यथा नदी परिवहन खात्यावर धडक मोर्चा नेऊ, असा इशारा त्यांनी दिला.

प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले, काही महिन्यांपूर्वी नदी परिवहन खात्याचे मंत्री व अधिकारी केरळ येथे गेले होते. तेथील रो-रो फेरीबोटीपासून प्रेरणा घेतल्यानंतर गोव्यातील फेरीबोटींना भाडेवाढ तसेच दुचाकींना तिकीट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. नदीवर पूल बांधण्यास सरकार अपयशी ठरल्यानेच फेरीबोट सेवा सरकारने मोफत केली होती. मग आता अचानक तिकीट लागू का केली जात आहे. सरकारने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला.

पर्यटकांकडून तिकीट घ्या

फेरीबोटींद्वारे प्रवास करणाया पर्यटकांकडून तिकीट घ्यावी. कारण ते तिकिटाचे १०० रुपये सहज खर्च करू शकतात. फेरीबाट भाडेवाढ करण्यापूर्वी रोज फेरीबोटींद्वारे किती जण प्रवास करतात याचा सरकारने सर्व्हे केला होता का? असा प्रश्न आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी उपस्थित केला.

 

Web Title: we will march and stop panaji will attack river transport department congress protest against ferry boat fare increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा