३३ आमदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू : मुख्यमंत्री
By किशोर कुबल | Published: October 25, 2023 03:56 PM2023-10-25T15:56:18+5:302023-10-25T15:56:32+5:30
दक्षिण गोव्याची जबाबदारी असलेले केंद्रीय तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी घेतली बैठक
पणजी : भाजपचे २८, मित्र पक्ष मगोपचे २ व अपक्ष ३ मिळून ३३ आमदारांच्या पाठिंब्यावर गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. दक्षिण गोव्याची जबाबदारी असलेले केंद्रीय तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज या सर्व आमदारांची बैठक घेतली. अपक्ष आमदार रेजिनाल्द लॉरेन्स गोव्याबाहेर असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आता केवळ १६० दिवस राहिले आहेत. त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळाले. मतदारसंघनिहाय कशा पद्धतीने पुढे जाता येईल व दोन्ही मतदारसंघ कसे जिंकता येतील याबाबत आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणाले की,' गोव्यात केंद्र सरकारच्या योजना ९९ टक्के कुटुंबापर्यंत पोचलेल्या आहेत आणि लोकांचा भाजपला पाठिंबा आहे. दोन्ही मतदारसंघनिहाय चर्चा झाली. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांच्या मतदारसंघात विविध कामे चालू आहेत, त्याचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या मदतीने आगामी दोन-तीन महिन्यात हाती घ्यावयाचे विकास प्रकल्प यावरही चर्चा झाली. गोवा देशातील पहिले डिजिटल राज्य बनविण्याचा आमचा मानस आहे. केंद्राकडे त्यासाठी वेगळा निधीही आम्ही मागितला आहे.'
उमेदवार निश्चित झाले आहेत का, असे विचारले असता भाजप प्रदेशाध्यक्ष, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, भाजपची उमेदवार निवडीसाठी एक पद्धत आहे. त्यानुसार राज्य निवडणूक समिती नावांची शिफारस केंद्रीय संसदीय मंडळाकडे करील आणि नंतर उमेदवार निश्चित केला जाईल. हे सर्व निवडणूक जाहीर झाल्यानंतर होणार आहे.'
राजीव चंद्रशेखर म्हणाले की,' डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास जलद गतीने होऊ लागला आहे. गोव्यात युवकांमध्ये कौशल्य विकासासाठी जो उपक्रम सरकारने चालवला आहे तो उल्लेखनीय आहे. गेल्या दहा वर्षात गोवा राज्यात आणि देशभरात कायापालट झालेला आहे. भारताला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून जगभरातील पहिल्या पाच राष्ट्रांमध्ये बसवण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ठेवले आहे. गोव्यातील जनतेने भाजपचा विकास पाहिला आहे. त्यामुळे दोन्ही जागा भाजपलाच मिळतील, याबद्दल दुमत नाही.' पत्रकार परिषदेस उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर हेही उपस्थित होते.