वीकेंड आला, गोव्याला चला! कोकण रेल्वेची विशेष गाड्यांची व्यवस्था; गर्दी टाळण्यासाठी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 09:43 AM2024-08-14T09:43:23+5:302024-08-14T09:45:06+5:30
कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार या रेल्वेगाड्या, वाचा सविस्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बहुतांशी गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यातच या वीकेंडला सलग सुट्या आहेत. त्यामुळे विविध मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी १५ ते १७ ऑगस्ट या वीकेंडसाठी कोकण रेल्वे विशेष गाड्या चालविणार आहे.
वीकेंड एन्जाॅय करण्यासाठी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. उपलब्ध गाड्यांत प्रवाशांची अतिरिक्त गर्दीची शक्यता आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनल - मडगाव जंक्शन (०११४९) ही विशेष गाडी १५ ते १७ ऑगस्टदरम्यान चालविली जाणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनलवरून रात्री ९ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मडगाव जंक्शवर पोहोचेल.
या गाड्यांना इथे आहेत थांबे...
परतीच्या प्रवासासाठी १६ ते १८ ऑगस्टदरम्यान मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक टर्मिनल (०११५०) ही विशेष गाडी मडगाव जंक्शन येथून सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनलला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड तसेच थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.