वजन व माप खात्याच्या छाप्यात 2.13 कोटींचे एसी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 03:54 PM2018-04-27T15:54:32+5:302018-04-27T15:54:32+5:30
थ्री स्टारची वातानुकूलित यंत्रे फाईव्ह स्टार म्हणून विकणा-या आणि ही यंत्रे आयात केल्याची तारीख लपवून ठेवणा-या वेर्णा येथील लॉईडच्या गोदामावर वजन व माप खात्याने शुक्रवारी धाड घालून 2.13 कोटींचे एसी जप्त केले.
मडगाव : थ्री स्टारची वातानुकूलित यंत्रे फाईव्ह स्टार म्हणून विकणा-या आणि ही यंत्रे आयात केल्याची तारीख लपवून ठेवणा-या वेर्णा येथील लॉईडच्या गोदामावर वजन व माप खात्याने शुक्रवारी धाड घालून 2.13 कोटींचे एसी जप्त केले. हल्लीच्या काळात या खात्याने केलेली ही मोठी जप्ती ठरली आहे.
वजन व माप खात्याचे दक्षिण गोव्याचे सहाय्यक नियंत्रक अरुण पंचवाडकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या खात्याने मडगाव येथील नवनीत स्टेशनरीच्या आणखी एका गोदामावर धाड घालून 5 लाखांच्या वह्या व एक्रेलिक रंग पकडले. यातील ब-याच साहित्यावर किंमत लिहिण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले.
सध्या गरमीचा मोसम चालू असताना एसीना मागणी वाढली असताना सरकारच्या नव्या नियमांप्रमाणे पूर्वीचे फाईव्ह स्टार असलेले एसी आता थ्री स्टार करण्यात आले आहेत. याचाच फायदा उठवून जुन्या फाईव्ह स्टारच्या स्टीकरवर नवीन थ्री स्टारचा स्टीकर बसवून ज्यावेळी हे एसी विकले जात होते त्यावेळी थ्री स्टारचा स्टीकर काढून पूर्वीच्या फाईव्ह स्टार स्टीकरसह हे एसी विकले जायचे. यासंबंधात वजन व माप खात्याकडे तक्रारी आल्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात पकडलेल्या एसीवर आयात तारीखही नमूद करण्यात आली नसल्याचे दिसून आले. या कारवाईत अरुण पंचवाडकर यांच्यासह उत्तर गोव्याचे सहाय्यक नियंत्रक प्रसाद शिरोडकर, वजन व माप खात्याचे मडगावचे निरीक्षक विकास खानोलकर, डिचोलीचे निरीक्षक गुलाम गुलबर्ग, सावर्डेचे निरीक्षक सुजन राणो, म्हापसाचे निरीक्षक नितीन पुरुशन तसेच सांगेचे निरीक्षक शुबर्ट फर्नाडिस यांनी भाग घेतला. अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालू राहील, असे पंचवाडकर यांनी सांगितले.