वजन व माप खात्याच्या कारवाईत दीड लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 08:10 PM2019-06-26T20:10:14+5:302019-06-26T20:10:49+5:30
कुडचडेचे निरिक्षक शुबर्ट डिकॉस्टा यांनी केलेल्या कारवाईत सुमारे चार हजार टिश्यू पेपर्सचे पॅक पकडले.
मडगाव : पॅकर्स नोंदणीचे कुठलेही प्रमाणपत्र नसताना विकले जाणारे सुमारे एक लाख रुपयांचे टीश्यू पेपर बुधवारी वजन व माप खात्याने केलेल्या कारवाईत पकडण्यात आले. याशिवाय जास्त किंमतीत विकले जाणारे पतंजली आस्था ड्राय हूप आणि किंगफिशरचे कॅन असा एकूण दीड लाखांचा माल पकडण्यात आला. ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन वजन व माप खात्याने ही कारवाई केल्याची माहिती खात्याच्या सूत्रांकडून मिळाली.
कुडचडेचे निरिक्षक शुबर्ट डिकॉस्टा यांनी केलेल्या कारवाईत सुमारे चार हजार टिश्यू पेपर्सचे पॅक पकडले. कायद्याने असा माल पाकिटबंद करायचा असेल तर त्याला पॅकर्स रजिस्ट्रेशनकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मूळ किंमत बदलून नव्या जास्तीच्या किंमतीत विकले जाणारे पतंजली आस्थाचे ड्राय हुप्सची 1488 खोकी म्हापसा येथे गुलाब गुलबर्ग यांनी केलेल्या कारवाईत तर 50 खोकी मडगावात देमू मापारी यांनी केलेल्या कारवाईत पकडण्यात आली. वास्कोजवळील साकवाळ येथे एका वाईन शॉपवर किंगफिशर ड्रॉट बिअयरचे 500 मिलीलिटरचे कॅनही किंमत बदलून विकतात, अशी तक्रार आल्यानंतर वास्कोचे निरिक्षक नितीन कुरुशन यांनी केलेल्या कारवाईत अशा बिअरचा एक खोका जप्त करण्यात आला. वजन व माप खात्याचे मुय नियंत्रक किरण कोसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नियंत्रक अरुण पंचवाडकर व प्रसाद शिरोडकर यांच्या निरिक्षणाखाली केलेल्या या कारवाईत सुधीर गावकर, पास्काल वाझ, दामू पावसकर व लुर्दीस पिंटो यांचा समावेश होता.