क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा स्वागतार्ह प्रस्ताव!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 07:42 AM2023-12-16T07:42:05+5:302023-12-16T07:42:33+5:30
देशात केंद्रीय निधीतून उभारले गेलेले एकमेव राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ईशान्येकडील मणिपूर या छोट्याशा राज्यातील इंफाळ येथे आहे.
वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार
गोव्यात आयआयटीचं घोडं बराच काळ झाला तरी अडकून पडलं आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच संपन्न झाला आणि राज्यात फिल्म सिटी उभारण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होऊ लागली आहे. राज्यसभेतील आमचे नवे खासदार सदानंद तानावडे यांनी राज्यसभेत केंद्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना गोव्यात केंद्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करत मांडलेला प्रस्ताव, हा आता चर्चेसाठी नवा विषय होऊ शकेल. किंबहुना तो व्हायलाच हवा आणि या प्रस्तावाचे सर्व स्तरात स्वागतही व्हायला हवे.
आयआयटी, फिल्म सिटी आणि आता क्रीडा विद्यापीठ हे तिन्ही प्रकल्प गोव्यात झाल्यास या चिमुकल्या राज्याच्या उत्कर्षात अजून भरच पडेल, यात संदेह नाही, आयआयटी प्रकल्प बऱ्याच कालावधीनंतर का होईना अखेर मार्गी लागत असल्याचे संकेत मिळत आहेत, याचे समाधान आहे. फिल्म सिटी उभारण्याबाबत सरकार किती गंभीर आहे हे कळायला मार्ग नसला तरी इफ्फीच्या समारोहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तशी घोषणा केली असल्याने त्यांना आता या प्रस्तावास चालना द्यावीच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार आणि गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केंद्र सरकारच्या निधीतून राज्यात क्रीडा विद्यापीठाची स्थापना केली जावी, यासाठी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जो प्रस्ताव मांडला तो पूर्ण विचारांती आणि राज्य सरकारशी चर्चा करूनच सादर केलेला असेल, असे मानण्यास बरीच जागा आहे आणि तसे असेल तर या प्रस्तावाचे स्वागतच करायला हवे.
गोव्यात नुकतेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन झाले आणि या छोट्याशा प्रदेशातही क्रीडा संस्कृती खोलवर रूजली असल्याचे आमच्या क्रीडापटूंनी विक्रमी संख्येने पदके मिळवून उर्वरित देशाला दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव खासदार सदानंद तानावडे यांनी मांडावा हा योगायोग तर अजिबात म्हणता येणार नाही. खासदार सदानंद तानावडे हे गोव्याचे विकासपुरुष स्व. मनोहर पर्रीकर यांच्या तालमीत तयार झालेले गडी असल्याने राज्याच्या सर्वांगीण विकासात आपलेही थोडे योगदान असावे या मानसिकतेतून त्यांनी याकरिता पुढाकार घेतला असेल तर त्यांना त्यासाठी पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य ठरते.
देशात केंद्रीय निधीतून उभारले गेलेले एकमेव राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ईशान्येकडील मणिपूर या छोट्याशा राज्यातील इंफाळ येथे असून साधारणतः त्याच धर्तीवर गोव्यातही अशा विद्यापीठाची उभारणी करता येईल, याच विचारातून खासदार सदानंद तानावडे यांनी हे पाऊल उचलले असावे. इंफाळ येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची झालेली स्थापना तशी जुनी नाही तर केंद्रातील भाजप सरकारच्या कारकिर्दीत म्हणजे १६ मार्च २०१८ रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विद्यापीठाची पायाभरणी केली होती. केंद्रातील भाजप सरकारला देशात खेळ संस्कृतीचा प्रसार झालेला हवा आहे आणि त्यातूनच असे प्रकल्प सगळीकडे नेण्याच्या त्यांच्या धोरणांतर्गत गोव्यात असे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यास केंद्रीय निधी मिळण्याची आशा बऱ्यापैकी बाळगता येईल.
इंफाळ येथे क्रीडा विद्यापीठात शारीरिक शिक्षण आणि क्रीडा या विषयांतील पदवी आणि पदव्युत्तर असा अभ्यासक्रम असून खेळात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या असंख्य क्रीडापटूंसाठी अशा संस्था वरदान ठरू शकतात आणि गोव्यासारख्या प्रदेशातही क्रीडा विद्यापीठ उभे राहिल्यास त्याचा लाभ तर अनेक अर्थाने होऊ शकेल. राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना म्हटले की त्यासाठी जागा निश्चित करण्यापासून ते उपलब्ध करून देण्यापर्यंतचे अनेक सोपस्कार पार पाडण्याचे काम राज्य सरकारलाच करावे लागेल आणि आयआयटीप्रमाणे त्याची फरफट होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल, गोव्यात या विद्यापीठाच्या उभारणीसाठी राज्य सरकारला सर्वप्रथम पाच-सहा लाख चौरस मीटर एवढी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उचलावी लागेल.
हे खरे असले तरी या विद्यापीठाच्या स्थापनेतूनच, राज्यात बऱ्यापैकी रुजलेल्या खेळ संस्कृतीची मुळे अधिक खोलवर जाण्यास मदतच होईल, क्रीडाविषयक साधनसुविधांमध्ये वाढ होणे महत्त्वाचे असल्याने क्रीडा विद्यापीठ त्यासाठी पूरक ठरू शकेल, राज्यसभेत नुसता प्रस्ताव मांडल्याने काहीही साध्य होणार नाही याचे भान ठेवून स्वता तानावडे तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही त्याचा पाठपुरावा करून तो मार्गी कसा लागेल यावर भर दिला तर क्रीडा विद्यापीठही नजीकच्या काळात गोव्यात साकार होऊ शकेल.
महाराष्ट्र या आपल्या शेजारी राज्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता त्याचे काम नेमके कुठवर पोहचले याची माहिती नसली तरी खेळाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा सगळ्याच राज्य सरकारांचा प्रयत्न यातून दिसतो. आपण मागे वा बेसावध राहिलो तर हा प्रकल्प आपल्याकडे नेण्यासाठी अन्य राज्येही टपून आहेत, याचे भान ठेवूनच त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.
शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम, प्रशिक्षण अशा अनेक क्षेत्रात शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल, हे सर्व लक्षात घेता खासदार सदानंद तानावडे यांनी मांडलेल्या प्रस्तावाचे स्वागत करून त्याबद्दल त्यांचे अभिनंदनही करावे लागेल. राज्यातील डबल इंजिन सरकारसाठी क्रीडा विद्यापीठ अजून एक मैलाचा दगड ठरू शकेल.