...तर वागातोरमध्ये सनबर्नचे स्वागतच: मायकल लोबो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 09:49 AM2024-09-30T09:49:24+5:302024-09-30T09:50:22+5:30
हीच जागा योग्य असल्याचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सनबर्न कोणालाही नको असल्यास वागातोरला त्याचे स्वागतच आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी म्हटले आहे. वागातोरचीच जागा योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वागातोर हा भाग शिवोली मतदारसंघात येत असून तेथे त्यांची पत्नी डिलायला आमदार आहे. दक्षिण गोव्यात तसेच कामुर्ली येथेही सनबर्नला विरोध झाल्यानंतर लोबो यांचे रविवारी हे विधान आले.
लोबो म्हणाले की, 'सनबर्न कोणीच स्वीकारायला तयार नाहीत. दक्षिण गोव्यात तो आयोजित केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरतील व त्यामुळे गोव्यासाठी ते लाजिरवाणे ठरेल. पूर्वी हा ईडीएम कांदोळी येथे कळंगुट मतदारसंघात व्हायचा. आता तो वागातोर येथे डिलायला यांच्या शिवोली मतदारसंघात होतो. वागातोर येथील जागा सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. सरकारने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुठली जागा सयुक्तिक ठरेल. यावर चर्चा विनिमय होण्याची गरज आहे. 'लोकांना सनबर्न त्यांच्या गावात नकोय, गोव्यातील कुठल्याही गावात सनबर्न स्वीकारार्ह असल्यास मी पाठिंबा देईन. कोणी सनबर्न नेण्यास तयार नसल्यास वागातोरला या ईडीएमचे स्वागतच आहे. हीच जागा योग्य आहे.'
केला होता विरोध...
दरम्यान, वागातोरला सनबर्न होत असल्याने डिसेंबरच्या अखेरच्या सप्ताहात पर्यटक हंगाम जोरात असतो. तेव्हा स्थानिक शॅकवाल्यांचे नुकसान होते. सनबर्नमुळे या भागात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे डिलायला लोबो यांनी याआधी यावर आवाज उठवला होता. परंतु मायकल यांनी आता स्वागताची भूमिका घेतली आहे.