आर्श्चयम्... विहीरेच्या पाण्याने घेतला पेट: सुरक्षेसाठी विहीर केली सील
By पंकज शेट्ये | Published: November 27, 2023 10:02 PM2023-11-27T22:02:23+5:302023-11-27T22:02:30+5:30
माटवे-दाबोळी येथील घटनेने खळबळ
वास्को : माटवे - दाबोळी येथील जेक्सन फर्नांडिस यांच्या विहिरीतील पाण्याने पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जेक्सन यांना विहिरीतील पाण्यातून पेट्रोलसारखा वास आल्याने त्यांनी विहिरीतील पाणी बाहेर काढून आग लावली असता पाण्याने पेट घेतला. या घटनेची माहिती पंच निलम नाईक यांनी प्रशासनाला दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, माटवे येथील जेक्सन फर्नांडिस यांच्या घराबाहेर खुप जुनी विहिर आहे. त्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरले जाते. मात्र, नळ जोडणी आल्यापासून जेक्सन कुटूंब या विहिरीचे पाणी जास्त वापरत नव्हते. दोन दिवसांपासून नळाला कमी पाणी आल्याने कुटूंबीयांनी विहिरीचे पाणी वापरण्यासाठी काढले असता त्यांना पाण्यात पेट्रोलियम पदार्थासारखा वास येऊ लागला. पाण्याची चाचणी करण्यासाठी विहिरीतून पाणी बाहेर काढले असता त्यांना पाण्याचा रंग हलका पिवळा झाल्याचे दिसून आले. त्याबाबत फर्नांडिस कुटुंबीयांनी सोमवारी पंच निलम नाईक यांनी माहिती दिली.
माटवे परिसरातील विहिरीतून पेट्रोलियम पदार्थाचा वास येत असल्याचे कळताच आपण जैवविविधता समितीचे अध्यक्ष रुई आरावजो व इतरांसोबत विहिरीची पाहणी केल्याचे नाईक म्हणाल्या. पाहणीत विहिरीच्या पाण्यातून पेट्रोलसारखा वास आला. ते पेट्रोल, डीझल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाहणीवेळी विहिरीतील पाणी एका बादलीत बाहेर काढून नंतर त्याला आग लावली असता पाण्याने पेट घेतला. यावेळी परिसरातील अन्य काही विहिरीतूनही असाच वास येत असल्याची माहिती स्थानिकांनी पंच नाईक यांना दिली. माटवे परिसराच्या वरच्या भागातून विविध पेट्रोलियमचा साठा एका व्यवस्थापनाला पाठवण्यासाठी भूमीगत वाहिनी आहे. त्या वाहिनीला गळती लागून तो पदार्थ विहिरीत मिसळला गेला असावा, असा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाकडून तपासणी
या घटनेबाबत उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीची पाहणी केल्याचे सांगितले. तसेच विहिरीचे पाणी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तलाठ्यांनी विहिरीची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच जलस्रोत व गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळानेही पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याची सूचना दिल्याचे करमळी यांनी सांगितले.
‘त्या’ घटनेची आठवण
काही वर्षापूर्वी बोगमाळो येथील एका विहिरीतून असाच वास येण्यास सुरवात झाली होती. त्या विहिरीतील पाणी बाहेर काढून आग लावली असता त्यालाही आग लागली होती. त्यानंतर विहिरीतील पाणी बाहेर काढून ती विहिर साफ केली. जेक्सन यांच्या विहिरीतून असाच वास येत असल्याने विहीरीतील पाणी हटवण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार असल्याचे पंच नाईक यांनी सांगिले.