गोव्यातील सर्व कॅसिनो बंद करा, काँग्रेसच्या बैठकीत ठराव
By Admin | Published: November 14, 2016 08:24 PM2016-11-14T20:24:01+5:302016-11-14T20:24:01+5:30
मांडवी नदीतील कॅसिनोंसह राज्यातील सगळेच कॅसिनो बंद केले जावेत, अशी मागणी करणारा ठराव काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सोमवारी मांडून संमत
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 14 - मांडवी नदीतील कॅसिनोंसह राज्यातील सगळेच कॅसिनो बंद केले जावेत, अशी मागणी करणारा ठराव काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सोमवारी मांडून संमत करण्यात आला. ही माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी खासदार शांताराम नाईक यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी दिली.
चोडणकर म्हणाले, की सर्वप्रथम रवी नाईक यांच्या काळात कॅसिनोस आरंभ झाला. त्यानंतर प्रत्येक सरकारने कॅसिनो सुरू ठेवले. कॅसिनोंचे सामाजिक, आर्थिक व अन्य सर्व प्रकारचे दुष्परिणाम गोमंतकीय सध्या अनुभवत आहेत. कॅसिनोंमुळे पाच हजार कोटींची महसुल गळती होत आहे. सरकारने ताबडतोब मांडवीतील कॅसिनो बंद करावेत. तसेच हॉटेलांमधीलही कॅसिनो सुरू ठेवू नयेत. कॅसिनो कर्मचा:यांचे पुनर्वसन करावे आणि महसुल प्राप्तीचे अन्य मार्ग सरकारने शोधावेत, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
पेडण्याहून पदयात्र
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो व विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणो यांनीही कार्यकारिणी बैठकीत भाग घेतला. गोवा सरकारच्या अपयशाबाबत जागृती करण्यासाठी येत्या दि. 27 पासून राज्यात पदयात्र काढावी, असाही निर्णय बैठकीत झाल्याचे चोडणकर यांनी सांगितले. पेडण्याहून यात्रेस आरंभ होईल. एकूण 35 मतदारसंघांमध्ये यात्र फिरेल. काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या घरोघर जाऊन सरकारविरुद्ध आरोपपत्रचे वितरण करत आहेत, असे चोडणकर यांनी सांगितले.
खास दर्जाच्या मागणीबाबत प्रथम मनोहर र्पीकर व मग मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यू-टर्न घेतला. काँग्रेस पक्ष निवडणूक जाहिरनामा आता तयार करील. आम्ही जी आश्वासने पाळता येतात, अशाच आश्वासनांचा समावेश जाहिरनाम्यामध्ये करू, असेही चोडणकर यांनी सांगितले. आम्हाला आर्थिकदृष्टय़ा खास दर्जा नको. घटनेच्या 371 कलमांखाली गोव्याला विशेष तरतुदी व विशेष अधिकार हवे आहेत. यालाच प्रचलित अर्थाने खास दर्जा म्हटले जाते. आम्ही या विषयाचा केंद्राकडे पाठपुरावा करू, असे खासदार शांताराम नाईक यांनी सांगितले. हा विषय काँग्रेसच्या अजेंडय़ावर आहे, असेही ते म्हणाले.