सहल जीवघेणी ठरली, गोव्यातील बार्से येथे एकाचा तळीत बुडून मृत्यू
By सूरज.नाईकपवार | Published: April 29, 2024 11:10 AM2024-04-29T11:10:32+5:302024-04-29T11:11:00+5:30
जवळपास तासभरानंतर मृतदेह शोधून काढण्यात आला. मयत राजेंद्र हा विवाहीत असून, त्याला दोन मुलेही असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मडगाव: सहल जीवावर बेतण्याची दुदैवी घटना काल रविवारी गोव्यातील किर्लादेव बार्से येथे घडली. राजेंद्र शाबा वेळीप असे त्या दुदैवी मयताचे नाव आहे. मित्रांबरोबर सहलीला गेला असता, जेवणापुर्वी भांडी धुण्यासाठी तळीत उतरला असता, तो बुडला. दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. नंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला.
कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचजणांचा एक गट सहलीसाठी बार्शे येथील रानात असलेल्या एका तळीजवळ गेले होते. त्यात राजेंद्रही सहभागी झाला होता. मौजमजा केल्यानंतर जेवण करण्याची वेळ झाल्याने त्यापुर्वी भांडी धुण्यासाठी तो तळीत उतरला असता अचानक बुडला. मदतीसाठी त्यांच्या मित्रांनी एकच आक्रोश केला. स्थानिक लोकही घटनास्थळी धावून आले. गावच्या सरपंचानी नंतर ही माहिती कुंकळ्ळी पोलिस ठाण्याला कळविली. ती मिळताच पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. जवळपास तासभरानंतर मृतदेह शोधून काढण्यात आला. मयत राजेंद्र हा विवाहीत असून, त्याला दोन मुलेही असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृतदेहावर आज सोमवारी शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह मयताच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला.