कुत्र्याला खायला गेला अन् पिंजऱ्यात अडकला; गोव्यात पहिल्यांदाच ब्लॅक पँथर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 04:11 PM2023-04-01T16:11:06+5:302023-04-01T16:11:24+5:30
दोन कंपार्टमेंटचा पिंजरा यासाठी वापरतात. त्यात लहान कंपार्टमेन्टमध्ये कुत्रा किंवा बकऱ्याला ठेवले जाते.
वासुदेव पागी
पणजी: बाळ्ळी परिसरात लोकवस्तीत वावर असलेला ब्लॅक पँथर अखेर शनिवारी पहाटे वनखात्याच्या पिंजऱ्यात अडकला. ब्लॅपँथर जेरबंद झाल्यामुळे या भागातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गोव्यात पहिल्यांदाच ब्लॅक पँथर पकडला गेला आहे.
ब्लॅक पँथरची दहशत संपविण्यासाठी वनखात्याकडून मागील महिनाभरापासून प्रयत्न सुरू होते. अनेक ठिकाणी सापळे रचण्यात आले होते. शेवटी बाळ्ळी येथील वनखात्याच्या कॉलनीजवळ वनखात्याकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात तो अडकलाच. पिंजऱ्यात ठेवलेल्या कुत्र्याचा फडशा फाडण्यासाठी तो पिंजऱ्यात शिरला आणि मागून पिंजऱ्याचे दार बंद झाले. त्यानंतर शुटकेसाठीही पँथरने आधळआपट चालविली होती हे सीसीटीव्ही कॅमऱ्यातून दिसून येते. मागील अडीच महिन्यापासून या ब्लॅक पँथरला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्थानिक वनाधिकारी संदीप भंडारी यांनी दिली.
दरम्यान गोव्यात ब्लॅक पँथरचा वावर असल्याचे संकेत अनेकवेळा मिळाले होते. वनखात्याच्या छुप्या कॅमऱ्यातही ब्लॅक पँथर टीपले गेले होते. आता पिंजऱ्यात अडकला गेल्यामुळे गोव्यातील ब्लॅक पँथरच्या वावराव शिक्कामोर्तब झाले आहे.
असा लावतात पिंजरा
दोन कंपार्टमेंटचा पिंजरा यासाठी वापरतात. त्यात लहान कंपार्टमेन्टमध्ये कुत्रा किंवा बकऱ्याला ठेवले जाते. वाघाला आत शिरण्यासाठी मोठ्या कंपार्टमेन्टमध्ये वाट ठेवली जाते, परंतु दोन्ही कंपार्टमेन्ट स्वतंत्र असल्यामुळे ऐआत शिरलेला वाघ कुत्र्याला इजा करू शकत नाही. तसेच एकदा आत शिरला की त्याच्या मागे पिंजऱ्याचे दार आपोआप खाली सरकून ते बंद होते. यावेळी वाघाच्या पिंजऱ्यात एक कोंबडी ठेवण्यात आली होती. कुत्र्याला खायला पिंजऱ्यात शिरलेला वाघ कोंबडीचा फडशा फाडून जायबंदी झाला.