अंगणात खेळायला गेली, भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडली; लहानग्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:53 IST2025-04-19T11:52:47+5:302025-04-19T11:53:39+5:30

सुट्टीत आईसोबत मामाकडे आलेल्या छोट्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला ५० मीटर फरफटत नेले. गंभीर जखमी अवस्थेत लहानगी तळमळत पडली होती.

went to play and found in the clutches of stray dogs tragic end for little girl incident in ponda goa | अंगणात खेळायला गेली, भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडली; लहानग्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

अंगणात खेळायला गेली, भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडली; लहानग्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: सुट्टीत आईसोबत मामाकडे आलेल्या छोट्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. शुक्रवारी भल्या पहाटे अंगणात खेळत असलेल्या पावणेदोन वर्षीय अनाबिया शेख हिचा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना तळे दुर्गाभाट येथे घडली. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, लोकांमध्ये भटक्या कुत्र्यांविषयी संतापाची भावना आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, शेख कुटुंब शहापूर-फोंडा येथे राहते. पावणेदोन वर्षीय अनाबिया शेख ही आईसोबत दोन दिवसांपूर्वी तळे दुर्गाभाट येथे मामाकडे सुट्टीला आली होती. शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास अनाबिया उठली. घराचा दरवाजा उघडा दिसताच ती बाहेर आली. दुर्दैवाने त्यावेळी मुख्य गेटसुद्धा खुलेच होते.

५० फूट फरपटत नेले

अनाबिया गेटमधून बाहेर, रस्त्यावर येताच परिसरात असलेल्या कुत्र्यांनी तिच्यावर अचानक हल्ला चढवला. तिला फरफटत सुमारे ५० मीटर लांबवर नेले. तिथे त्या कुत्र्यांनी तिच्यावर जोरदार हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत अनाबिया तळमळत पडली होती.

लोकांची आरडाओरड

सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहून आरडाओरड केला. त्यामुळे स्थानिक धावत तेथे पोहोचले. जखमी अनाबियाला तत्काळ फोंडा येथील सबजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचे दिसताच तिच्या आईने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. या शेख दाम्पत्याला लग्नानंतर अनेक वर्षे मूल नव्हते. जवळपास पाच वर्षानंतर अनाबियाचा जन्म झाला होता. तिचा अशा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू हा कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या जीवाचा चटका लावणारा ठरले आहे. या घटनेनंतर या परिसरात भीतीचे वातावरण आहे. तसेच लोकांमध्ये संतापाचेही वातावरण आहे.

भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न : नगराध्यक्ष

या घटनेबद्दल बोलताना नगराध्यक्ष आनंद नाईक म्हणाले की, पीपल फॉर अॅनिमल यांच्या सहकार्याने आम्ही भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जमेल तेवढ्या कुत्र्यांचे स्टरलायझेशन आम्ही करत आहोत.

भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. स्थानिकांवर कायमच भटकी कुत्री हल्ला करीत असतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. या घटनेची माहिती मिळताच फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रितेश नाईक, मगोचे युवा नेते डॉ. केतन भाटीकर हे घटनास्थळी दाखल झाले. नगरसेवक रितेश नाईक म्हणाले की, सध्या फोंड्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे याची माहिती आम्हाला आहे. आम्ही कुर्टी पशुसंवर्धन खात्याच्या कार्यालय परिसरात एक जागा निवडली आहे. तिथे फोंडा परिसरातील सर्व कुत्र्यांना नेऊन त्यांना स्टरलाइज करण्यात येईल. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कशी आटोक्यात आणता येईल, यावर सुद्धा उपाययोजना काढण्यात येणार आहे. सदरची जागा मिळवण्यासाठी आम्ही सोपस्कार करत असून ती जागा मिळताच आम्ही पुढील सोपस्कार पूर्ण करू. जे कुणी कुत्र्यांना खाऊ-पिऊ घालत आहेत त्यांना आम्ही दोष देत नाही, कारण शेवटी ते चांगलेच काम करत आहेत. फक्त त्यांनी एका ठरावीक जागेत कुत्र्यांच्या पालन-पोषणाची खबरदारी घ्यावी. अशा घटना आम्हाला भविष्यात घडू नयेत, असे आमचे प्रयत्न आहेत.

घटना दुर्दैवी, पालकांनी काळजी घ्यावी

कृषी मंत्री रवी नाईक म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांना मारता येत नाही, हे जरी खरे असले तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करता येतील. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. पालकांनी मुलांना आपल्या देखरेखीमध्ये ठेवावे. काळजी घेतल्याशिवाय त्यांना रस्त्यावर सोडू नये. शाळेत नेताना आणताना मुलांची काळजी घ्यावी.
 

Web Title: went to play and found in the clutches of stray dogs tragic end for little girl incident in ponda goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.