परिस्थितीशी एकरूप होण्यास वेस्ट इंडिज सज्ज, बोर्ड एकादशविरुद्ध सराव सामना आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 06:47 AM2018-09-29T06:47:04+5:302018-09-29T06:47:20+5:30
भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी केवळ दोन दिवसांचा एकच सामना खेळण्याची संधी आहे.
बडोदा - भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी केवळ दोन दिवसांचा एकच सामना खेळण्याची संधी आहे. बोर्ड एकादशविरुद्ध शनिवारपासून होणाºया सामन्याद्वारे पाहुणा संघ परिस्थितीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणार आहे.
विंडीजला भारतात १० सप्टेंबर रोजीच यायचे होते. पण मैदान उपलब्धत नसल्याचे कारण पुढे करीत त्यांचे आगमन लांबवण्यात आले. बीसीसीआयने स्थानिक क्रिकेट मोसमामुळे विंडीजला सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात असमर्थता व्यक्त केल्यानंतर विंडीजने दुबईतील आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमीत सराव केला होता.
सराव सामन्यात विंडीजला केमर रोच याची उणिव जाणवेल. तो कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर बार्बाडोसला परतला. मालिका सुरू होण्याआधी तो संघात परत येईल. बोर्ड एकादश संघात मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, हनुमा विहारी हे युवा खेळाडू असून करुण नायर कर्णधार आहे.