"पाश्चात्य शक्ती गोव्याबद्दल विकृत चित्र निर्माण करत आहेत"
By किशोर कुबल | Published: December 18, 2023 03:02 PM2023-12-18T15:02:56+5:302023-12-18T15:03:17+5:30
‘गीतामृतम्’ कार्यक्रमात २२ हजार विद्यार्थ्यांचे राज्यात ठिकठिकाणी सामूहिक गीतापठण.
पणजी : काही पाश्चात्य शक्ती गोव्याबदद्ल विकृत चित्र निर्माण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी केला. गोव्याची विशिष्ट संस्कृती व अस्मिता आहे. सरकार आणि गोव्यातील तमाम जनता ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दोनापॉल येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर संस्कृती भारती, गोवा व डॉ. के. बी. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित ‘गीतामृतम्’ कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ गोवा ही भोगभूमी नव्हे, तर कर्मभूमी असून दक्षिण काशी म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. सांस्कृतिक, आध्यात्मिक पर्यटन, आयुर्वेद, योग यातून गोव्याने हे दाखवून दिले आहे. पाश्चात्य शक्तींनी गोव्याचे विकृत चित्र उभे केले असले तरी सरकार आणि गोव्यातील तमान जनता या प्रदेशाचे सुसंस्कृत रुप जगासमोर पोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.’
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भगवद् गीता कुठल्याही जाती, धर्माचीच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारी आहे. हा केवळ धर्मग्रंथ नवे तर राष्ट्रग्रंथ आहे. जगातील सर्वात जास्त कुठल्या ग्रंथाचे भाषांतर झालेले असेल तर ते भगवद् गीतचे झालेले आहे. माजी राष्ट्रपती तथा थोर शास्रज्ञ दिवंगत अब्दुल कलाम हे देखील रोज भगवद् गीतेतील अध्यायाचे पठण करीत असत.
२२ हजार विद्यार्थ्यांनी केले सामूहिक गीतापठण
भगवद् गीतेतील बारावा व पंधरावा अध्याय या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला. राज्यात ठिकठिकाणी सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतापठण केल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. दिल्लीतील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वारखेडी, स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो राजभाषा उपसंचालक अनिल सामंत, आनंद देसाई, सुभाष देसाई आदी याप्रसंगी उपस्थित होते.