वेलिंगकरांच्या आव्हानात दम आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 09:46 PM2019-01-11T21:46:03+5:302019-01-11T21:46:48+5:30
‘मित्र असावा तर असा, व शत्रू असू नये असा’ असा अनुभव मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रा. स्वं. संघाचे गोव्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्याबाबत सध्या घेत आहेत.
- राजू नायक
‘मित्र असावा तर असा, व शत्रू असू नये असा’ असा अनुभव मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रा. स्वं. संघाचे गोव्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्याबाबत सध्या घेत आहेत. पर्रीकर गेले सात महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत. त्यांचा आजार बळावत चालला आहे. गेले काही दिवस तर केमोथेरपी घेत असल्याने त्यांचे अस्तित्वही जाणवलेले नाही.
या काळात त्यांनी मुख्यमंत्रिपदावर राहावे की नाही याबाबत मतभिन्नता आहे. त्यांचे राजकीय विरोधक व राजकीय विश्लेषकही पर्रीकरांनी सत्ता सोडावी व आराम करावा या मताचे आहेत. काँग्रेस पक्ष तर पर्रीकरांनी या परिस्थितीत राज्यशकट हाकणे अत्यंत चूक असल्याचे सांगून ‘जनआक्रोश’ आंदोलन चालवत आहे. भाजपा आणि सरकारातले घटक पक्ष पर्रीकरांच्या बाजूने उभे आहेत. प्रशासन योग्य पद्धतीने चालू असल्याचा त्यांचा दावा असतो.
परंतु, पर्रीकरांच्या निकटच्या वर्तुळातून दूर झालेले सुभाष वेलिंगकर मात्र त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढताना थकत नाहीत. त्यांनी शिक्षण माध्यम प्रश्नावर सरकारशी काडीमोड घेतला व संघाचा त्याग केला. संघाचा मोठा पाठीराखा वर्ग घेऊन त्यांनी आता गोवा सुरक्षा मंच स्थापन केला आहे. पंरतु ते भाजपापेक्षा पर्रीकरांचे प्रमुख टीकाकार बनले आहेत. इतके की त्यांच्याएवढी जहाल भाषा प्रमुख विरोधी पक्षाचे नेतेही वापरत नाहीत.
गुरुवारी वेलिंगकरांनी पर्रीकरांवर टीका करताना ते अत्यंत निर्लज्जपणे सत्तेला चिकटून बसल्याचा आरोप केला. सध्या वेलिंगकर खाण अवलंबितांच्या आंदोलनाबरोबर सतत दिसतात. त्यांच्या प्रत्येक सभेत ते अत्यंत तिखट बोलतात व त्यांचे लक्ष्य पर्रीकर असतात. पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या गोव्यातील विधानसभा पोटनिवडणुकांत ‘गोवा सुरक्षा मंच’चे उमेदवार असतील असेही त्यांनी जाहीर केले आहे. भाजपाला धडा शिकवायला हवा; कारण त्यांनी प्रत्येक वचनाचा भंग केला, असे ते म्हणाले.
ज्या कोणाला पर्रीकर-वेलिंगकर यांची मैत्री माहीत आहे, त्यांना या वैराच्या आजच्या स्वरूपाबद्दल आश्चर्य वाटते. दोघेही समवयस्क आहेत व दोघांनी भाजपाची राज्यात बांधणी केली. परंतु वेलिंगकर यांना इच्छा असूनही त्यांना भाजपात अधिकृतरीत्या पाठविले गेले नाही. दुस-या बाजूला पर्रीकर अत्यंत झपाटय़ाने भाजपात वाढत गेले. त्यांनी एकहाती राजकीय नेतृत्व केले व या पक्षाला- ज्याचे अस्तित्व नगण्य होते- सत्तास्थानी आणले. त्यामुळे पर्रीकरांचे नाव सर्वतोमुखी झाले व केंद्रातही दबदबा निर्माण होऊन त्यांना संरक्षणमंत्रिपदही प्राप्त झाले. वेलिंगकर याची महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिली व त्याचे पर्यवसान कटुतेत झाले व दोघेही एकमेकांचा तिरस्कार करू लागले असे जाणकार मानतात.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंचने मगोप व शिवसेनेशी युती करून रिंगणात उडी घेतली होती. परंतु त्यांची अनामतही जप्त झाली असली तरी वेलिंगकरांनी ज्या पद्धतीने राजकीय पोटतिडकीने किल्ला लढणे चालविले आहे, त्याचे निरीक्षकांना आश्चर्य वाटते. त्यामागे पर्रीकरांच्या विरोधातील सुडाची भावना आहे की सूत्रबद्ध राजकीय विचार आहे, त्याचा मात्र अजून उलगडा झालेला नाही. लोकसभा निवडणूक व निकट आलेल्या पोटनिवडणुकांत गोवा सुरक्षा मंचपेक्षा वेलिंगकरांचीच खरी कसोटी लागणार आहे.
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)