जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:31 IST2025-04-09T12:30:58+5:302025-04-09T12:31:32+5:30
नावेली येथे दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळावा

जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भाजप सरकारने दहा वर्षात देशासह गोव्यातही अमुलाग्र बदल केले आहेत. ही कामे लोकापर्यंत पोहोचवणे भाजप कार्यकर्त्यांचे ध्येय असले पाहिजे. काँग्रेसला जे ५० वर्षात जमले नाही, ते भाजपने दहा वर्षांत करून दाखवले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मंगळवारी आयोजित दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. नावेलीतील दैवज्ञ ब्राह्मण सभागृहात हा मेळावा झाला. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार दिगंबर कामत, कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर, गणेश गावकर, उल्हास तुयेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पदाधिकारी शर्मद रायतुरकर, अनिता थोरात, सुवर्णा तेंडुलकर, प्रभाकर गावकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कार्यकर्त्यांनी मेळाव्यात दिली जाणारी पुस्तके आणि पत्रिका वाचली पाहिजे. त्याचे कारण म्हणजे, पक्षाची आणि त्याच्या कार्याची जेवढी माहिती कार्यकर्त्यांना असेल, तेवढ्याच आत्मविश्वासाने ती माहिती ते जनतेपर्यंत पोहोचवू शकतील.
विकासाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन
मुख्यमंत्र्यांनी डिजिटल इंडिया, महिला सशक्तीकरण, महामार्ग जोडणी, रेल्वेमार्ग, जलमार्ग जोडणी, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील बदल याविषयी माहिती दिली. यावेळी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर भाजप नेत्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शर्मद रायतुरकर आणि केले. आभार अनिता थोरात यांनी मानले.
प्रगती पाहता, २७ आमदार आलेच पाहिजे
प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, दहा वर्षांत देशात तसेच राज्यात मोठी प्रगती झाली. भाजप पक्षाची सदस्य संख्या वाढली आणि आणखीन लोक पक्षाशी जोडले गेले. देशाची प्रगती आणि राज्यात होणारा बदल पाहता येणाऱ्या २०२७ च्या निवडणुकीत भाजपचे २७ पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले पाहिजे. याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि पक्षासाठी काम केले पाहिजे.
भाजपमुळे आमूलाग्र बदल
काँग्रेस पक्षाने देशावर ५० वर्षे राज्य केले आणि फक्त आपली मनमानी करून स्वहित पाहिले. पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली निवडून आले, त्यापासून ते आजपर्यंतच्या कालखंडात विविध क्षेत्रात भाजप सरकारने देशात तसेच राज्यात आमूलाग्र बदल घडवून आणले. काँग्रेस पक्ष फक्त चुकीची माहिती लोकांमध्ये देत आहे. भाजप संविधानात बदल घडवून आणेल आणि त्याचा लोकांना त्रास होईल, असा अपप्रचार त्यांनी केला. पण वस्तुस्थिती पाहता, देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस पक्षाने ६० वेळा संविधानात बदल आणले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि अनेकांना तुरुंगात डांबले.