डीपीआरचे काय झाले सांगा?: मायकल लोबो, म्हादईबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:16 PM2023-08-04T12:16:04+5:302023-08-04T12:17:27+5:30
सहकार व जलस्रोत खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादईबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. कळसा- भांडुरा प्रकल्पाबाबत कर्नाटकला केंद्र सरकारने मंजूर केलेला डीपीआर हा रद्द होणार का नाही हे सांगावे, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी विधानसभेत केली.
सहकार व जलस्रोत खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. कर्नाटक म्हादईचे पाणी वळवू पाहत आहे; मात्र या विषयावर मागील काही वर्षांपासून केवळ भाषणे व चर्चाच होत आहेत; मात्र आता सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. म्हादईचे पाणी हे गोव्याचेच असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोबो म्हणाले की, म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम कर्नाटक करीत आहे. या कामाची पाहणी काही वर्षांपूर्वी सरकारी पथकाने केली होती. त्यात आपणही होतो; मात्र सदर विषय जैसे थेच आहे.
कर्नाटक कालवे बांधून म्हादईचे पाणी वळवले आहे. म्हादईचे पाणी गोव्यात वाहत असल्याने त्यावर आमचा जास्त अधिकार आहे. एका बाजूने गोव्यातील अनेक भागांमध्ये विशेष करून किनारी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तसेच जलसिंचनासाठी पाण्याची कमतरता असतानाच दुसरीकडे मात्र म्हादई वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारला प्रश्न
कर्नाटककडून शेती तसेच उद्योगांसाठीही या पाण्याचा वापर होणार आहे. म्हादईचा विषय हा न्यायप्रविष्ठ असला तरी सरकारने पूर्ण शक्तीनिशी हा विषय सोडवावा. कर्नाटकला मंजूर केलेला डीपीआर हा रद्द होणार का नाही ? म्हादईचा वाद कधीपर्यंत मिटणार हे सांगावे, अशी मागणी लोबो यांनी केली.