शिक्षकांना काय झालेय? गुन्हे आणि विद्यार्थ्यांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 03:48 PM2023-10-05T15:48:49+5:302023-10-05T15:49:27+5:30
गोव्यात अलीकडे शिक्षकांविरोधात पोलिसांत गुन्हे नोंद होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.
गोव्यात अलीकडे शिक्षकांविरोधात पोलिसांत गुन्हे नोंद होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. शिक्षकांना काय झालेय तेच कळत नाही. काही शिक्षक विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकतात, तर काहीजण विद्याथ्र्यांना बेदम मारहाणप्रकरणी संतापाचा विषय बनू लागले आहेत. गोवा बाल कायद्याखाली पोलिसांत शिक्षकांविरुद्ध तक्रारी नोंद होऊ लागल्या आहेत.
मुलांना बेदम मारहाण करण्यापर्यंत शिक्षकांचे वर्तन बिघडले असेल तर काही शिक्षकांनाच विद्यार्थी बनून शाळेतील बाकावर बसण्याची गरज आहे, असे म्हणावे लागेल. अलीकडे फोंडा तालुक्यात घडलेली घटना भयावह आहे. विद्यार्थ्याला मारहाण केल्याची तक्रार पालकाने पोलिसांत केली. दोन दिवसांपूर्वी काणकोणातील एका खासगी विद्यालयात असाच प्रकार घडला. सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने मॉपचा वापर करून मारहाण केली असा आरोप आहे. फरशी पुसण्यासाठी मॉपचा वापर केला जातो. त्याने विद्यार्थ्याला मारहाण केली गेली, अशी तक्रार पालकांनी पोलिसांत केली. पोलिसांनी चिल्ड्रन अॅक्टच्या कलम ३५ खाली गुन्हा नोंद केला आहे. विद्यार्थ्याला इस्पितळातही न्यावे लागले. संबंधित शिक्षकाचे नाव पोलिसांनी जाहीर केले आहे.
एक काळ होता जेव्हा शिक्षकांना समाजात खूप मान होता. आदर होता. आतादेखील निष्ठेने व अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा बजावणारे अनेक शिक्षक आहेत. मध्यंतरी काळ असा आला होता, की काही शिक्षक बियर पिऊन शाळेत यायचे. आता तशी स्थिती नाही; पण राज्याच्या अत्यंत दुर्गम भागात शिक्षकांच्या गैरवर्तनाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. शिक्षकांकडून केले जाणारे विनयभंग तर पालकांमध्ये मोठचा प्रमाणात चर्चेस असतात. काही प्रकरणी पोलिसांत तक्रार होत असते. अलीकडे विनयभंगाचे दोन गुन्हे राज्यात गाजले. एका शिक्षकाला अटकही झाली. शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते हे एरव्ही अत्यंत पवित्र मानले जाते. वयात आलेल्या विद्यार्थिनींशी शिक्षक जर गैरवर्तन करू लागले तर शिक्षकी पेशाची हानी होईल. गालबोट लागेल. काही शिक्षकांनी विनयभंग करून डाग लावून घेतलेलाच आहे. काही शिक्षकांनी स्वतः चा मानसन्मान घालविला आहे
सरकार दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्काराने शिक्षकांना गौरविते. राष्ट्रीय पुरस्कारही शिक्षकांना मिळतात. राज्य शिक्षक पुरस्कारासाठीच्या निवड प्रक्रियेत राजकारण व पक्षपातीपणा होत असला तरी काही पात्र शिक्षकांना पुरस्कार मिळालेत, हेही मान्य करावे लागेल. शिक्षकांकडून पिढी घडविण्याचे काम केले जाते. काही शिक्षक दुर्गम भागात सायकल किंवा दुचाकीने जाऊन मुलांना शिकवतात. अशा शिक्षकांविषयी प्रत्येकाला आदर आहे व असायलाच हवा. मात्र मुलांना बेदम मारहाण करण्यापर्यंत काही शिक्षकांची मजल गेल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. शिक्षकांविरुद्ध पालकांना वारंवार पोलिसांत जावे लागले तर शिक्षक म्हणजे व्हीलन अशी प्रतिमा तयार होईल. आता कायदे पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. कडक झाले आहेत. छडी लागे छम छम, विद्या येई घमघम असे आता करता येत नाही. शिक्षकांच्या हातून छडी कधीच गायब झाली आहे. मात्र, काही शिक्षक हातातील पट्टी किंवा फळा पुसण्याचा डस्टर वापरून मुलांना मारहाण करतात. हे थांबवावे लागेल. रागाच्या भरात शिक्षक विद्यार्थ्यांना मारहाण करू लागले तर विद्यालयात येणेदेखील मुलांना नकोसे वाटेल.
शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया वाटायला हवी. काही भागात विद्यार्थी मस्ती करणारे असतात. दहावी- बारावीला पोहोचलेले काही विद्यार्थी शिक्षकांच्या सहनशीलतेलाच आव्हान देतात. हे जरी खरे असले तरी, या स्थितीवर चांगल्या प्रकारे मात करावी लागेल. शिक्षकांना डोके शांत ठेवावे लागेल. झोपडपट्टी भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांशीही आपुलकीने बोलून किंवा अन्य प्रकारे त्या मुलांना आपलेसे करावे लागेल. मुलांना मारहाणप्रकरणी शिक्षकांना जर अटक करण्याची वेळ पोलिसांवर आली तर त्यातून एकूण समाजाचीही नाचक्की होईल. शिक्षकांनी भानावर येण्याची गरज आहे. प्रत्येक शिक्षक साने गुरुजी होऊ शकत नाहीत; पण अधिकाधिक शिक्षक जर मातृहृदयी, प्रेमळ, सद्गुणी, सदाचारी बनले तर समाजाचे कल्याणच होईल.